कोतवाल, आपटेला  जामीन; पुन्हा अटक; बदलापूर शाळा अत्याचारप्रकरणी सत्र न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 09:01 AM2024-10-04T09:01:02+5:302024-10-04T09:01:09+5:30

कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. मुळे यांच्यासमोर गुरुवारी त्यांना हजर करण्यात आले.

bail to Kotwal, Apte; Arrest again; Sessions Court Order in Badlapur School molestation Case | कोतवाल, आपटेला  जामीन; पुन्हा अटक; बदलापूर शाळा अत्याचारप्रकरणी सत्र न्यायालयाचा आदेश

कोतवाल, आपटेला  जामीन; पुन्हा अटक; बदलापूर शाळा अत्याचारप्रकरणी सत्र न्यायालयाचा आदेश

लाेकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर मुलीचे पालक आणि पोलिस यांच्यावर प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकणारे शाळा संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना एका गुन्ह्यात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला, तर दुसऱ्या गुन्ह्यात त्यांचा ताबा पोलिसांकडे दिला. या दोघांना बुधवारी कर्जत येथून अटक करण्यात आली होती. दोघांनाही पुन्हा आज, शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दोन मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी अक्षय शिंदे याच्यासह शाळेचे अध्यक्ष कोतवाल आणि सचिव आपटे या दोघांच्या विरोधात दोन्ही मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी अक्षयच्या एन्काऊंटरनंतर शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. बुधवारी रात्री कर्जतहून कोतवाल आणि आपटे या दोघांना अटक केली. या दोघांच्या विरोधात दोन वेगवेगळे गुन्हे आहेत. 

कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. मुळे यांच्यासमोर गुरुवारी त्यांना हजर करण्यात आले.

काय घडले कोर्टात?
सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी सांगितले की, एका प्रकरणात न्यायालयाकडे पाच दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्याचा तपास करणे बाकी आहे.
आरोपी शिंदे याला कामावर ठेवले होते. या प्रकरणात पोलिस कोठडी द्यावी. मात्र, न्यायालयाने ही मागणी ग्राह्य न धरता सरकारी पक्षाने त्यांचे म्हणणे मांडावे असे सांगितले असता सरकारी वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला.
एक गुन्हा जामीनपात्र असल्याने आरोपींच्या वकिलानी जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केल्याने त्यांना या गुन्ह्यात जामीन मिळाला.

ताबा पोलिसांकडे 
दोन्ही आरोपींना एका गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे, मात्र दुसऱ्या गुन्ह्यात दोन्ही आरोपींचा ताबा पोलिसांकडे देण्यात आला. दोन्ही आरोपींनी यापूर्वी उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. 

Web Title: bail to Kotwal, Apte; Arrest again; Sessions Court Order in Badlapur School molestation Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.