वादाचा बदला घेण्यासाठी बार मॅनेजर आणि वेटरवर शस्त्राने हल्ला, तिघांना अटक
By प्रशांत माने | Published: June 15, 2023 06:43 PM2023-06-15T18:43:11+5:302023-06-15T18:43:27+5:30
नाबीर हा कल्याण पूर्वेतील नांदीवलीतील कशिश बार अॅण्ड रेस्टॅारन्टमध्ये कामाला होता.
डोंबिवली : बार मॅनेजर आणि अन्य एका वेटर बरोबर झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी त्यांच्यावर शस्त्राने हल्ला करून त्यांना लुटणाऱ्या वेटरला आणि त्याच्या दोन साथीदारांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. नाबीर इन्सफअली शेख रा. उल्हासनगर असे अटक केलेल्या वेटरचे नाव असून त्याला साथ देणाऱ्या प्रेमकुमार गोस्वामी आणि सुरज विश्वकर्मा रा. आंबिवली यांनाही अटक केली आहे.
नाबीर हा कल्याण पूर्वेतील नांदीवलीतील कशिश बार अॅण्ड रेस्टॅारन्टमध्ये कामाला होता. तेथील मॅनेजर भिम सिंग आणि वेटर अकलेश चौधरी यांच्याबरोबर त्याचा वाद झाला होता. वादानंतर त्याने नोकरी सोडली होती. परंतू वादाचा राग त्याच्या मनात होता. यातून २७ मे च्या मध्यरात्री दोनच्या सुमारास मॅनेजर सिंग हे बार बंद करून दुचाकीने घरी जात असताना नाबीरने साथीदारासह मलंगरोडवर सिंग यांच्यावर हल्ला केला यात सिंग जखमी झाले. त्यांची दुचाकी आणि डिक्कीत असलेली रोकड घेऊन नाबीर साथीदारासह तेथून पसार झाला. तर १० जूनच्या मध्यरात्री त्याने वेटर अकलेश याच्यावर देशमुख होम्स कमानी जवळ चाकूने हल्ला केला. अकलेशचे आयफोन व पैशांचे पाकीट घेवून नाबीरने पोबारा केला होता.
चोरीचाही अवलंबिला मार्ग
या गुन्हयांचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग करीत होती. वरीष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर , संजय माळी, पोलिस हवालदार विश्वास माने, अनुप कामत, बापुराव जाधव, बालाजी शिंदे, प्रविण बागुल, रमाकांत पाटील, श्रीधर हुंडेकरी, किशोर पाटील, विलास कडु, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे, बोरकर आदिंचे पथक तपास करत होते. गुन्हा घडलेल्या ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे तिघांच्या मुसक्या आवळण्यात पथकाला यश आले. हॉटेल मॅनेजर आणी वेटरवरील हल्ल्याच्या घटनेनंतर संबंधितांनी चोरीचा मार्गही अवलंबिला होता. मानपाडा आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन तर खडकपाडा पोलिस ठाण्यात एक गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल असून तीन दुचाकी आणि पाच मोबाईल असा १ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.