पाळीव श्वानाला आंघोळ घालणे बेतले जीवावर; तलावात बुडून भावाबहिणीचा दुर्दैवी अंत
By सचिन सागरे | Published: May 28, 2023 07:32 PM2023-05-28T19:32:08+5:302023-05-28T19:32:08+5:30
पाळीव श्वानाला आंघोळ घालण्यासाठी तलावात गेलेल्या भावाबहिणीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दावडी परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
डोंबिवली: पाळीव श्वानाला आंघोळ घालण्यासाठी तलावात गेलेल्या भावाबहिणीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दावडी परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. पाण्याच्या अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. कीर्ती रविंद्रन (१९) व रणजित रविंद्रन (२२) असे मयत भावा बहिणीचे नाव आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात रणजीत व कीर्ती हे दोघे भाऊ बहीण आपल्या कुटुंबासोबत राहत होते. रणजीत हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात होता. तर, ९८ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या कीर्तीने यंदा बारावीमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांचे आईवडील कामानिमित्त गावी गेले होते. त्यांच्याकडे पाळीव श्वान आहे. या श्वानाला आंघोळ घालण्यासाठी रविवारी दुपारच्या सुमारास रणजीत व कीर्ती हे दोघे जण दुचाकीवरून दावडी परिसरातील तलावावर गेले होते. तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे तलावात बुडाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मानपाडा पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.