श्वानाला आंघोळ घालणे बहीण-भावाच्या बेतले जीवावर, तलावात बुडून दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 09:55 AM2023-05-29T09:55:52+5:302023-05-29T09:56:22+5:30
श्वानाला आंघोळ घालण्यासाठी रविवारी नेहमीप्रमाणे तलाव परिसरात दोघे गेले होते.
डोंबिवली : पाळीव श्वानाला आंघोळ घालण्यासाठी तलावात गेलेल्या भावा बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दावडी परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. रणजित रवींद्रन (२२) व कीर्ती रवींद्रन (१७) अशी दुर्दैवी भावा-बहिणींची नावे आहेत.
पश्चिमेतील उमेशनगर परिसरात रणजित व कीर्ती हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या आजोबांचे महिनाभरापूर्वी निधन झाल्याने त्यांचे आई- वडील गावी गेले असून हे दोघेच येथे राहत होते. त्यांच्याकडे असलेल्या श्वानाला आंघोळ घालण्यासाठी रविवारी नेहमीप्रमाणे तलाव परिसरात दोघे गेले होते. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास श्वानाला आंघोळ घालताना दाेघांचा ताेल जाऊन ते पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागल्याने जीव वाचविण्यासाठी धडपडत होते.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तलाव परिसरात त्यांचा शोध घेतला असता रणजित व कीर्ती यांचे मृतदेह जवानांच्या हाती लागले. दोघांचे मृतदेह मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत.
दोघांना वाचविण्यासाठी श्वानाची धडपड
तलावात पडल्यानंतर बुडू लागल्याने रणजित व कीर्ती हे दोघेही जीव वाचविण्यासाठी धडपडत होते. त्यांची धडपड पाहून तलावाच्या काठावर उभा राहून श्वान जोरजोरात भुंकत होता. दुपारची वेळ असल्याने यावेळी फारशी वर्दळ नव्हती. याचदरम्यान श्वान का भुंकत आहे हे पाहण्यासाठी आलेल्या एका ग्रामस्थाने तलावात कोणी तरी बुडत असल्याचे पाहिले. त्यानंतर, ही माहिती अग्निशमन व पोलिसांना देण्यात आली.
धावत सुटला गाडीच्या मागे...
रणजित व कीर्ती यांचा शोध सुरू असताना काठावर उभा असलेला त्यांचा पाळीव श्वान सतत भुंकत त्यांना शोधत होता. कीर्ती व रणजित यांचे मृतदेह हाती लागल्यावर ते रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले. रुग्णवाहिका सुरू होताच श्वानही त्या गाडीच्या पाठीमागे धावू लागला. तेव्हा, त्याला तेथे उपस्थित असलेल्यांनी धरुन ठेवले. त्यांच्या दुचाकीच्या मागेही श्वान धावत होता.