"ससा आणि कासव व्हा, पुढे जा..." केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आमदार विश्वनाथ भोईर यांना आवाहन
By मुरलीधर भवार | Published: January 30, 2024 03:17 PM2024-01-30T15:17:22+5:302024-01-30T15:25:34+5:30
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील एका ठिकाणी आगरी कोळी कुणबी भवन उभारले जाणार आहे.
कल्याण - आगरी कोळी कुणबी भवनाच्या भूमीपूजन कार्यक्रम केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर या कार्यक्रमास अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीच चर्चा रंगली होती. मात्र मंत्री पाटील यांनी ससा आणि कासव व्हा, पुढे जा असे आवाहन आमदार भोईर यांना केले आहे.
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील एका ठिकाणी आगरी कोळी कुणबी भवन उभारले जाणार आहे. या भवनासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या भवनाच्या भूमीपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार प्रकाश भोईर, मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अर्जुन भोईर, भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे, वंडार कारभारी, मनसेचे पदाधिकारी विनोद केणे, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर उपस्थित नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले. कपिल पाटील यानी सांगितले की, ससा आणि कासवा व्हा, पुढे जा . समाजासाठी चांगले काम करा. हे भवन सर्व समाजासाठी उभे राहत आहे. यासाठी सगळ्यांनी काम केले पाहिजे. या वेळी आगरी कोळी कुणबी एकता महामंडळाचे अध्यक्ष अर्जून भोईर यांनी सांगितले की,लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता कधी लागू शकते. आचारसंहिता लागू झाल्यास फंड मिळणार नाही. त्यामुळे कार्यक्रम लवकर घेतला. ठाणे महापालिकेस गेलेला फंड आम्हाला उपलब्ध करुन दिला. त्यासाठी मंत्री कपिल पाटील यांचे आभार मानतो. हे भवन सर्व समाजासाठी आहे.