खबरदार, नव्या इमारती उभ्या कराल तर... थेंबभरही पाणी मिळणार नाही!
By पंकज पाटील | Published: November 25, 2023 08:50 AM2023-11-25T08:50:44+5:302023-11-25T08:51:28+5:30
अशावेळी नागरिक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेरतात.
पंकज पाटील
बदलापूर : बदलापूर पालिकेने शहरात तीन वर्षांत ४५० नव्या इमारतींना बांधकाम परवानगी दिली. आणखी २०० इमारतींच्या बांधकामांचा प्रस्ताव आहे. मात्र, खबरदार, नव्या इमारती उभ्या कराल तर एक थेंब पाणी देणार नाही, असा इशाराच नगरपालिका प्रशासनाला जीवन प्राधिकरणाने दिला आहे. प्राधिकरणाची भूमिका शहराच्या विकासात बाधा आणणारी असल्याचे नगरपालिकेचे मत आहे, तर सर्व सोंगे आणता येतील पण पाण्याचे सोंग कुठून आणायचे? असा सवाल प्राधिकरणाचे अधिकारी करीत आहेत.
शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यात प्राधिकरण अपयशी ठरत असून नव्या इमारती उभारताना पालिकेने पाण्याची उपलब्धता तपासावी, असा अलिखित फतवा काढला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. लोकसंख्येच्या तुलनेत वाढीव पाणी उपलब्ध होत नसल्याने जीवन प्राधिकरण हतबल झाले आहे. बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभारणीला नगरपालिका परवानगी देत आहे. मात्र या संकुलात वास्तव्याला येणाऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. अशावेळी नागरिक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेरतात.
बदलापूर, अंबरनाथला
१६ दशलक्ष लिटर्सची तूट
n महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना दररोज १४६ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
n अंबरनाथसाठी ७६, तर बदलापूरसाठी ७० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो.
n लोकसंख्येच्या तुलनेत अंबरनाथला ८९, तर बदलापूरला ७४ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. त्यामुळे तब्बल १६ दशलक्ष लिटर्स पाण्याची तूट असल्यामुळेच दोन्ही शहरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
जीवन प्राधिकरणामार्फत एमआयडीसीचे मार्केटिंग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वाढत्या शहराला पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र ते पाणीपुरवठा करू शकत नसल्यामुळे आता प्राधिकरणाचे अधिकारीच आपल्या ग्राहकांना थेट एमआयडीसीकडून पाणी घेण्याचा सल्ला देत आहेत.
अशी चलाखी
अनेक इमारतींना एमआयडीसीचे पाणी बदलापूरच्या शिरगाव परिसरामध्ये नव्याने विकसित होणाऱ्या अनेक गृहप्रकल्पांनी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन थेट एमआयडीसीकडे वाढीव पैसे भरून एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू केला आहे.
जलदगतीने विकास होणाऱ्या शहरांच्या यादीत बदलापूर असल्यामुळे या ठिकाणी गृहसंकुलांची परवानगी रोखता येणार नाही. प्राधिकरणाने पर्यायी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यातच अनेक विकासक आता स्वतःहून एमआयडीसीकडून पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाण्याची अनुपलब्धता हे कारण विकासाला बाधा ठरू नये एवढीच अपेक्षा आहे.
- योगेश गोडसे,
मुख्याधिकारी, बदलापूर
बदलापूर शहराला पाच एमएलडी अतिरिक्त पाण्याची गरज आहे. वाढीव पाणी मिळत नसल्यामुळे समस्या झाली आहे. नवीन इमारतींना केवळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे शक्य होते. इतर वापरासाठी पाणी देणे भविष्यात अवघड जाईल. पालिका आणि जीवन प्राधिकरण यांनी एकत्रितपणे ही समस्या सोडवणे गरजेचे आहे.
- माधुरी पाटील, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण