कल्याण स्टेशन परिसराच्या विकासाला सुरुवात; तीन वर्षांत मार्गी लावण्याची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 11:47 PM2021-01-29T23:47:06+5:302021-01-29T23:47:31+5:30
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ४९८ कोटींचे काम
कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पातून कल्याण रेल्वेस्थानक परिसराच्या विकासाला सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प ४९८ कोटी रुपयांचा असून, तो तीन वर्षांत पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामुळे या काळात स्टेशन परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा म्हणाले की, मध्य रेल्वेवरील जंक्शन असलेल्या कल्याण स्थानकातून दररोज तीन ते चार लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे स्मार्ट सिटीतून या परिसराचा विकास करणे हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत नागरिकांचा फिडबॅक घेतला तेव्हा स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी हा विषय प्रामुख्याने समोर आला. त्यामुळे या प्रकल्पाला प्राधान्य दिले गेले. इतक्या मोठ्या प्रकल्पास सुरुवातीस कंत्राटदार मिळत नव्हता. आता ४९८ कोटी रुपयांचे कंत्राट एनसीसीसीएल किंजल केटीआयएल यांना समभागात विभागून दिले आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसराच्या विकासकामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइनद्वारे सोमवारी झाला आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंत्राटदार कंपनीस काम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला असला तरी कामास गती देऊन दिलेल्या मुदतीआधी काम पूर्ण करावे, असे सूचित केले होते.
कसा होणार विकास?
सुभाष चौक ते बैलबाजार उड्डाणपूल.
रिक्षा, बस, टॅक्सी, दुचाकी यांचे वेगवेगळे मार्ग.
स्टेशन परिसरातील बस डेपो व कार्यशाळा विकसित करणे.
इमारतींच्या वरती पार्किंगची व्यवस्था.
बस डेपोकडील नाला विकसित करणे.
स्टेशन परिसरातील वाहनतळाचा विकास.
स्वयंचलित जिने उभारणे.