लाडकी बहीण कामात दिरंगाई केल्याचा ठपका; उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव निलंबित
By सदानंद नाईक | Published: July 19, 2024 03:18 PM2024-07-19T15:18:18+5:302024-07-19T15:18:30+5:30
उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती कार्यालय निहाय शासनाने जाहीर केलेल्या लाडली बहीण कामाचे अर्ज महिलांकडून भरून घेण्यात येत आहे.
उल्हासनगर : शासनाच्या लाडकी बहीण कामात सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव यांनी दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून आयुक्त अजीज शेख यांनी गुरवारी निलंबनाची कारवाई केली. प्रभाग समिती क्रं-३ च्या कार्यालयाकडून सर्वात कमी अर्ज आल्याने निलंबनाची कारवाई केली.
उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती कार्यालय निहाय शासनाने जाहीर केलेल्या लाडली बहीण कामाचे अर्ज महिलांकडून भरून घेण्यात येत आहे. मात्र प्रभाग समिती क्रं-३ कार्यालयाचे सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव यांच्याकडून सर्वात कमी अर्ज आल्याचा ठपका आयुक्त अजीज शेख यांनी ठेवला. याबाबत जाधव यांच्याकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्याने, त्यांच्यावर गुरवारी निलंबनाची कारवाई केली. आयुक्तांच्या या कारवाईने इतर प्रभाग समिती कार्यालय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून शासनाची लाडकी बहीण योजना यशस्वी होण्यासाठी महिलांचे जास्तीतजास्त अर्ज भरून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. तसेच अर्ज नियमानुसार भरून घेण्याचे आदेश आयुक्त शेख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.
महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीकडून २५० ते ३०० अर्ज आले असतांना प्रभाग समिती क्रं-३ च्याकडून फक्त ५ अर्ज कसे? असा प्रश्न सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव यांना विचारण्यात आला. प्रभाग समिती क्रं-३ कार्यालय अंतर्गत सर्वाधिक झोपडपट्टीचा परिसर येत असतांनाही महिलांचे अर्ज कमी आले. याच कारणातून जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त किशोर गवस व सार्वजनिक सहायक अधिकारी मनीष हिवरे यांनी कामात दिरंगाई केल्याने निलंबनाची कारवाई केल्याची माहिती दिली. या कारवाईने अधिकारी व कर्मचाऱ्यां मध्ये आयुक्तांबाबत भीतीयुक्त दरारा निर्माण झाला. जाधव नंतर कोणाचा नंबर? असा प्रश्नही विचारला जात आहे.