वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान; महावितरणचे ग्राहकांना आवाहन
By अनिकेत घमंडी | Published: August 2, 2023 04:59 PM2023-08-02T16:59:55+5:302023-08-02T17:00:15+5:30
गेल्या काही महिन्यांत नागरिकांना असे बनावट मेसेज मिळण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्स ॲप मेसेज किंवा ई-मेल पाठवण्यात येत नाहीत, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
डोंबिवली: वीजग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा', असे बनावट मेसेज नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. यात वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा बनावट मेसेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे.
गेल्या काही महिन्यांत नागरिकांना असे बनावट मेसेज मिळण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्स ॲप मेसेज किंवा ई-मेल पाठवण्यात येत नाहीत, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी सायबर सेलमध्ये याआधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वत:हून मीटर रीडिंग पाठवण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठवण्यात येते आणि त्याचा सेंडर आयडी हा ‘एमएसईडीसीएल असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळवले जात नाही.
सध्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठवल्या जाणाऱ्या बनावट मेसेजला प्रतिसाद देऊ नये. बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये. तसेच मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी २४ तास सुरू असलेल्या १९१२, १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा. तसेच असे मेसेज आल्यास पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.