सावधान... तुम्हीही होऊ शकता शिकार, बतावणी करीत लुटला जातोय ऐवज!
By प्रशांत माने | Published: April 9, 2023 06:58 PM2023-04-09T18:58:42+5:302023-04-09T18:58:56+5:30
साधारण ५० वर्षापुढील तसेच वृद्ध व्यक्तींना लक्ष केले जात असल्याचे घडलेल्या घटनांमधून स्पष्ट होत आहे.
डोंबिवलीः एकिकडे कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीसह दिवसा घरफोडीचे प्रकार वाढले असताना दिवसाढवळया गजबजलेल्या ठिकाणी संमोहित तसेच बोलण्यात गुंतवून भामट्यांकडून नागरिकांच्या अंगावरील दागिने हातचलाखीने लांबविले जात आहेत. आठवडयाभरात चार घटना अशा घडल्या असून यातील तीन घटना डोंबिवलीतील आहेत. साधारण ५० वर्षापुढील तसेच वृद्ध व्यक्तींना लक्ष केले जात असल्याचे घडलेल्या घटनांमधून स्पष्ट होत आहे.
दोघांनी दुचाकीवरून येऊन सोनसाखळी हिसकावून पलायन करण्याच्या घटनांनी महिला वर्गात असुरक्षिततेची भावना असताना आता गजबजलेल्या रहदारीच्या ठिकाणी पुरुष तसेच वृद्ध देखील सुरक्षित नाहीत हे आठवड्यात घडलेल्या घटनांमधून समोर आलेय. कल्याण पश्चिमेकडील डिएचएल कंपनीचे कार्यालयासमोर बस स्टॉपवर अरविंद बागल ( वय ६२) हे बसची वाट पाहत होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती तिथे आल्या आणि काका एवढे सोन्याचे दागिने घालू नका असे बोलण्यात गुंतवले आणि बागल यांच्या अंगावरील ४६ हजाराचे दागिने हातचलाखीने लंपास केले. ही घटना ३१ मार्चला घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. उर्वरीत तीन घटना डोंबिवलीत घडल्या आहेत.
डोंबिवली पुर्वेकडील रामनगर हद्दीत ३ आणि ४ एप्रिलला अनुक्रमे हनुमंत गोसावी (वय ५६) आणि अनिल तांबे (वय ७२) यांना बोलण्यात गुंतवून तसेच संमोहित करीत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने दोघा भामट्यांकडून लांबविण्यात आले. या घटना शहीद भगतसिंग मार्ग आणि टिळकचौकात सकाळी पावणेअकरा ते दुपारी साडेबारा दरम्यान घडल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेला राजन खोत या ६१ वर्षीय वृद्ध व्यक्तीला लुबाडण्यात आल्याची घटना ३ एप्रिललाच घडली. त्यांच्याकडील दोन लाखांचा सोन्याचा ऐवज दोघा भामट्यांनी हातचलाखीने लांबविला. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिस असल्याची बतावणी करीत याआधी सर्रासपणे लूटले जायचे. आमच्या शेठला मुलगा झाला आहे तो गरीबांना साडया वाटतोय गरीब दिसण्यासाठी अंगावरील दागिने काढून ठेवा, पुढे खून झालाय पोलिसांची नाकाबंदी चालू आहे दागिने काढून ठेवा अशा बतावण्या करीत लुटले जायचं. गोंधळात टाकून लक्ष विचलित करुन लुबाडण्याचे प्रकार सर्रास सुरु झालेत. बतावणी करणारा भामटा इतका आत्मविश्वासाने बोलतो की त्याच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवून नागरिक फसवणूकीला बळी पडत असल्याचे घडणाऱ्या घटनांमधून समोर येत आहे.