भगवान भोईर स्कूल क्रिकेट अकॅडमी अजिंक्य
By सचिन सागरे | Published: April 17, 2024 05:10 PM2024-04-17T17:10:17+5:302024-04-17T17:10:46+5:30
भगवान भोईर हायस्कूल संघाचे मुख्य प्रशिक्षक प्रज्योत नंदकुमार सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत भाग घेण्यात आला.
कल्याण : भगवान भोईर हायस्कूल संघाने मोहन सीसी संघावर १११ धावांनी मात करत बारा वर्षांखालील मुलांच्या डॉ. साळगावकर क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा पश्चिमेकडील वायले नगर येथील युनियन क्रिकेट ग्राउंड येथे पार पडली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ युनियन क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख तुषार सामानी, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि भगवान भोईर हायस्कूलचे मार्गदर्शक प्रशांत भोईर यांच्या उपस्थित संपन्न झाला.
भगवान भोईर हायस्कूल संघाचे मुख्य प्रशिक्षक प्रज्योत नंदकुमार सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत भाग घेण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना बीबीएचएस संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद १८८ धावांचे लक्ष्य उभारले. अनुज चौधरी (८७), आरुष खंदारे (४९), आरुष कोल्हे (३०) यांनी संघाच्या धाव संख्येत मोलाचे योगदान दिले. यश साळुंकेने १० धाव देत ३ बळी मिळवत गोलंदाजीत चमक दाखवली. या आव्हानाचा पाठलाग करताना मोहन सीसी संघाचा डाव ७७ धावांवर सिमित राहिला. स्वर्ण काटकर (२०) आणि आराध्या चिंचघरकर (१५) यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली.
बीबीएचएस संघाचे सर्वोत्कृष्ट फलंदाज अनुज चौधरी (४ डाव २२१ धावा) आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज यश साळुंखे (४ डावात ११ बळी) ठरले.