उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब चौधरी रातोरात शिंदे गटात
By अनिकेत घमंडी | Published: December 22, 2022 12:58 PM2022-12-22T12:58:18+5:302022-12-22T12:59:30+5:30
खासदार संजय राऊत यांचे खंदे समर्थक, राऊतांचे ठाकरे गटातून हकालपट्टीचे ट्विट व्हायरल
डोंबिवली: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे खन्दे समर्थक, डोंबिवलीचे रहिवासी, ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख आणि नाशिकचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी बुधवारी रात्री उशिराने नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्याची कुणकुण लागताच राऊत यांनी ट्विटद्वारे भाऊसाहेब चौधरी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे जाहीर केल्याने खळबळ उडाली.
राऊत यांचे खास समर्थक म्हणून राजकारणात चौधरी यांची ओळख होती. राऊत यांचा आश्रय आणि आशीर्वादाने चौधरी यांनी डोंबिवली शहरप्रमुख, महापालिका निवडणुकीतील उमेदवारी ते नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदापर्यंत मजल मारली होती. सामान्य शिवसैनिकाला मानाची पदे देण्यात आल्याने राऊत यांचा पाठिंबा असल्याची सर्वत्र चर्चा सुरू होती. राऊत आणि थेट मातोश्रीचा आशीर्वाद भाऊंच्या पाठीशी होता,पण तरीही ते शिंदे गटाकडे का गेले असा प्रश्न शहर परिसरात चर्चेत आहे. ते शहरप्रमुख असताना संघटनापेक्षा गटतटाचे राजकारण अधिक तयार झाले होते. औद्योगिक गॅस, व कोविड काळात हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन पुरवठादार व्यावसायिक म्हणून भाऊंची ओळख आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरात त्यांची गॅस' कंपनी आहे. कोरोना महासाथीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा झाला पाहिजे म्हणून एका समितीत चौधरी यांचा सक्रिय सहभाग होता.
तत्कालीन नगरविकास मंत्री असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या समन्वयाने जिल्ह्याला सुरळीत ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या कामात भाऊंनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. कोरोना काळात नाशिकमधील शेतकऱ्यांची औषध फवारणी यंत्र कल्याण, डोंबिवलीत आणून शहर स्वच्छतेत त्यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली होती. स्वच्छतेचा नाशिक पॅटर्न म्हणून हा उपक्रम प्रसिध्द झाला होता.
आर्थिक कोंडीमुळे शिंदे गटात उडी?
ठाणे जिल्ह्यातील अनेक महापालिका, इतर शासकीय विभागात भाऊ चौधरी निविदा प्रक्रियेतील स्पर्धेतून कामे घेत होते. बहुतांशी कामे वरिष्ठांच्या आशीर्वादाने भाऊंना मिळत होती. या कामांची देयके भाऊंचे वरपर्यंत असणाऱ्या संपर्कामुळे झटपट मिळत होती. शिवसेनेत फूट पडुनही भाऊंनी उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले होते. कामे आमच्यामुळे (शिंदे गट) मिळाली आणि सोबत (ठाकरे गट) त्यांना देता. त्यामुळे शिंदे गटाकडून भाऊंची महापालिकांमधील कामे, देयकांबाबत कोंडी करण्यास सुरुवात झाल्याची ठाकरे गटात चर्चा आहे. तो त्रास वाढू लागल्यामुळे भाऊ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचीही कुजबुज सुरू आहे. यासंदर्भात भाऊंना संपर्क साधला त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, शिवसेनेत गेली ३२ वर्षं मी पक्षात काम करतोय. शिवसेनेचा गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि डोंबिवलीचा शहर प्रमुख म्हणून काम करत असताना पक्षानं ज्या ज्या ठिकाणी मला जबाबदारी दिली असेल, त्याठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही नाशिककरांच्या अनेक व्यथा घेऊन तत्कालीन सरकारकडे गेलो. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही निवेदनं दिली. पण त्यातलं एकही काम मार्गी लागलं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"