कल्याण लोकसभेत ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमीपूजन; शासन आपल्या दारीतून ४५ लाख लाभार्थ्यांना लाभ
By मुरलीधर भवार | Published: March 4, 2024 07:25 PM2024-03-04T19:25:40+5:302024-03-04T19:26:02+5:30
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण लोकसभा मतदारसंघातील तब्बल ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन संपन्न झाले.
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने कल्याण मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तब्बल ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमीपूजन करण्यात आले. यात ठाणे पल्याड कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागासाठी उपयोगी ठरणाऱ्या आणि थेट ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईशी कनेक्टिव्हीटी देणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो १२ मार्गाचा समावेश आहे. तर काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर अंबरनाथ शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या कमाचाही यात अंतर्भाव आहे. यासोबतच मासळी बाजार, शास्त्रीनगर येथील शव विच्छेदन केंद्र, नवजात शिशुंसाठी अतिदक्षता विभाग, सुनीलनगर येथील अभ्यासिकेचे लोकार्पण आणि डोंबिवलीतील दत्तनगर येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे भूमीपूजन संपन्न झाले.
कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी रविवारचा दिवस मोलाचा ठरला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण लोकसभा मतदारसंघातील तब्बल ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन संपन्न झाले. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आपल्या मतदारसंघात विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्नशील असतात. कल्याण लोकसभा मतदारसंघात वेगवान वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण तळोजा या मेट्रो १२ मार्गासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद ठेवला.
पत्रव्यवहार, बैठका घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे सुमारे ५ हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या मेट्रो मार्गाच्या कामाला गती मिळाली. यातील आता १ हजार ८७७ कोटींच्या प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. मेट्रो १२ च्या उभारणीमुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ ही शहरे ठाणे, भिवंडी, कल्याण या मेट्रो ५ मार्गाशी जोडले जाणार आहेत. तर कल्याण, डोंबिवली आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच आसपासचा भाग थेट तळोजा मार्गे नवी मुंबईशी जोडला जाणार आहे. यामुळे कनेक्टिव्हिटीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. या मार्गाच्या उभारणीमुळे वाहतूक व्यवस्थेत दूरगामी परिणाम होतील. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेतील मासळी बाजार, शास्त्रीनगर येथील शव विच्छेदन केंद्र, नवजात शिशुंसाठी अतिदक्षता विभाग, सुनीलनगर येथील अभ्यासिकेचे लोकार्पण आणि डोंबिवलीतील दत्तनगर येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे भूमीपूजन संपन्न झाले.
ठाणे जिल्ह्यातील सध्याच्या घडीला आजही शाबूत असलेल्या अंबरनाथ शहरातील शिलाहारकालीन शिव मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अयोध्येच्या राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज उपस्थित होते. सुमारे १५० कोटी रुपये खर्चातून शिव मंदिर परिसर काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर विकासीत केला जात आहे. यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती, जलकुंडाची दुरुस्ती आणि नूतनीकरण, संरक्षक भिंत आणि घाटाची दुरुस्ती आणि नूतनीकरण, पादचारी पुलाची दुरुस्ती आणि नूतनीकरण यासह प्रवेशद्वार, प्रवेश सर्कल आणि नंदी, पार्किंग, प्रदर्शन केंद्र, अँपी थिएटर, अंतर्गत रस्ते, भक्त निवास, घाट, संरक्षक भिंत खेळाचे मैदान भाविकांसाठी भक्त निवास आणि स्वच्छतागृहं अशी कामं केली जाणार आहेत.
या कामामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे. शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पामुळे येथे पर्यटनाला चालना मिळेल. भविष्यात चलो अमरनाथच्याच धर्तीवर चलो अंबरनाथ असे लोक म्हणतील, असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तर सुमारे एक हजार वर्ष शिवचंद्र मौळी जणू परिसर सुशोभीकरणाची वाट पाहत होते. डॉ श्रीकांत शिंदे त्यासाठी आले अशा भावना अयोध्येच्या राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केल्या.
शासन आपल्या दारी
डोंबिवलीतील प्रीमियर कंपनी मैदानावर हजारो लाभार्थ्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्ताने विविध शासकीय योजनांचा लाभ तब्बल ४५ लाख लाभार्थ्यांना देण्यात आला. यापूर्वी रोजगार मेळावा, महिला सशक्तीकरण कार्यक्रमांच्या आयोजनातून डॉ श्रीकांत शिंदे यांनी हजारो गरजवंताला योजनांचा लाभ दिला आहे.