कल्याण लोकग्राम पादचारी पूलाचे आज भूमीपूजन
By मुरलीधर भवार | Published: June 16, 2023 08:43 PM2023-06-16T20:43:24+5:302023-06-16T20:43:43+5:30
या पूलाच्या कामाकरीता ४२ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
कल्याण- कल्याण रेल्वे स्टेशन आणि पूर्व भागाला जोडणाऱ््या लोकग्राम पादचारी पूलाचे भूमीपूजन उद्या कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे.
या पूलाच्या कामाकरीता ४२ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या भूमीपूजना पश्चात कल्याण डोंबिवलीसह आणि भिवंडीतील शिवसेना शिंदे गटाचा मेळावा अत्रे रंगमंदिरात पार पडणार आहे. या मेळाव्यास खासदार शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.
डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाच्या आरोखाली गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांच्या विराेधात भाजपने मोर्चा काढला.
या मोर्चात शिवसेना शिंदे गट सहभागी झाला नाही. शिंदे गटाकडून योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आरोप करीत भाजपने त्यांच्या पक्षाच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव केला. त्यानंतर राजकारण तापले. खासदार शिंदे यांनी राजीनामा देण्यास मी तयार आहे. उमेदवार कोण हे सांगा असे आवाहन दिले. हा वाद खूप गाजत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा वाद स्थानिक पातळीवरील आहे असे स्पष्ट केले.
मात्र काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार शिंदे यांच्या बैठक झाली. वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर उद्या कल्याणमध्ये खासदार शिंदे हे मेळावा घेणार असल्याने ते कार्यकर्त्यांना काय संबोधन करणार याकडे सगळयाचे लक्ष लागले आहे.