मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
By अनिकेत घमंडी | Published: July 6, 2024 10:26 AM2024-07-06T10:26:26+5:302024-07-06T10:27:00+5:30
रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सकाळी ९:१७ वाजता ते डबे जोडून गाडी पुढे धावल्याची माहिती देण्यात आली.
डोंबिवली: मनमाडहून मुंबईला निघालेल्या पंचवटी एक्स्प्रेसच्या डब्यांचे कपलिंग निघाल्याची घटना कसारा स्थानकात शनिवारी घडली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ऐन पावसात ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजताच्या सुमारास कसारा स्थानकात पंचवटी एक्स्प्रेसचे तीन आणि चार क्रमांकाचे डबे इंजिनपासून वेगळे झाले. त्यामुळे गाडी काही अंतरावर जाऊन थांबली. रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सकाळी ९:१७ वाजता ते डबे जोडून गाडी पुढे धावल्याची माहिती देण्यात आली. मात्र तोपर्यंत प्रवाशांनी गर्दी करून व्हिडिओ व्हायरल केले. फोटो समाज माध्यमांवर आल्याने नेमका अपघात किती मोठा आहे, याची चर्चा सुरू होती.
या गाडीने हजारो प्रवासी मनमाड, इगतपुरी, नाशिक येथून मुंबईत येतात, संध्याकाळी प्रवास करतात. वर्षानुवर्षे ही गाडी प्रवाशांना सेवा देते. या गाडीबद्दल प्रवाशांना आकर्षण असून अनेकांना सोयीची ही गाडी असल्याने अपघात झाला तरी प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करत पावसाचे दिवस असल्याने अशा घटना घडू शकतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त दिली.