डोंबिवलीतील २ कापड प्रक्रिया उद्योगातून प्रदूषण केले जात असल्याची भाजपची तक्रार
By मुरलीधर भवार | Published: September 20, 2023 05:02 PM2023-09-20T17:02:24+5:302023-09-20T17:03:19+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले नमुने, अहवाल येताच होणार कारवाई
कल्याण- डोंबिवलीतील पियूष आणि जयराज या दोन कापड प्रक्रिया उद्योगातून प्रदूषण केले जात असून त्यांच्याकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली आणि आैद्योगिक सुरक्षिततेचे पालन केले जात नाही अशी तक्रार कल्याण भाजप उप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
कल्याण भाजप उपाध्यक्ष पाटील यांनी या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ, सहाय्यक कामगार आयुक्त कल्याम, आैद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा संचालनालय कल्याण, कामगार आयुक्त या चारही विभागांकडे तक्रार केली आहे. पियूष आणि जयराज या दोन्ही कंपन्या कापड प्रक्रिया उद्याेग प्रकाराती आहे. त्याठीकाणी रासायनिक प्रक्रियेकरीता बा’यलरचा वापर केला जातो. त्याकरीता कोळसा जाळला जातो. तसेच प्रक्रियेपश्चात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी यावर योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात नाही.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेली नियमावलीचे पालन केले जात नाही. तसे कारखान्यातील कामगारांना सुरक्षिततेची साधने पुरविली जात नाहीत. कंपनीत १ हजार कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी ३ टक्के कामगारांनाच आरोग्य कामगार विमा आणि भविष्य निर्वाह निधीचा लाभ दिला जातो. उर्वरीत कामगारांना हा लाभ दिला जात नाही. त्यांना १२ तासापेक्षा जास्त राबवून घेतले जाते. त्यांना किमान वेतन दिले जात नाही. साप्ताहिक सुट्टीही दिली जात नाही. या विविध तक्रारींचा पाढाच पाटील यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केला आहे.
दरम्यान या तक्रारीची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून संबंधित दोन्ही कंपन्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्याठिकाणचे प्रक्रिया करण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेतले आहेत. ते प्रयोगशाळेकडे पाठविले गेल आहे. त्यांचा रिपोर्ट येताच पुढील योग्य ती कारवाई केली जाईल असे कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले आहे.