कंत्राटीचा जीआर मागे घ्या, शिक्षणात 'कंत्राटीकरण' नको!, भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By अनिकेत घमंडी | Published: September 13, 2023 03:31 PM2023-09-13T15:31:57+5:302023-09-13T15:33:43+5:30
भाजपाचे निमंत्रित प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांचे पत्र मागणी
अनिकेत घमंडी, डोंबिवली- शिक्षक हा देशाचे भावी संस्कारक्षम नागरिक घडवीत असतो. शिक्षकांच्या या योगदानामुळे शिक्षकांच्या हातात देशाचे भवितव्य असल्याने शिक्षण विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा शासन निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी शिक्षक नेते व भाजपाचे निमंत्रित प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
राज्य शासनाने शिक्षक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी दि ६ सप्टेंबर रोजी शिक्षकांसह इतर पदे बाह्य एजन्सीद्वारे भरण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षणक्षेत्रासह राज्यात बेरोजगार तरुणांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे.
या निर्णयामुळे शिक्षणक्षेत्राचे नुकसान होणार आहे. शाळांमध्ये कायम व कंत्राटी असे शिक्षकांचे दोन गट तयार होतील, कायम शिक्षकाला पूर्ण वेतन तर समान काम करणाऱ्या कंत्राटी शिक्षकाला अल्पवेतन मिळणार असल्याने समान काम समान वेतन या धोरणाची पायमल्ली होईल, वेतन निश्चिती नसल्याने शिक्षकांचे मन वर्गात रमणार नाही म्हणून गोरगरीब मुलांचे शिक्षण वाचविण्यासाठी शिक्षणात कंत्राटीकरण व कंपनीकरणाला कायमचे हद्दपार करावे अशी मागणी बोरनारे यांनी केली आहे. एकीकडे शाळांमधील रिक्त पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे तर दुसरीकडे कंत्राटीपद्धतीने भरती होणार असल्याने मेहनतीने टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निराशा झाली असल्याचे बोरनारे यांनी सांगितले.