भाजपला कमीशन खाण्याची सवय; शिवसेना नेत्याचं रविंद्र चव्हाणांच्या टीकेला प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 06:45 PM2021-11-19T18:45:01+5:302021-11-19T18:45:20+5:30
शिवसेना भाजपमधील आरोप प्रत्यारोपावरुन कल्याण डोंबिवलीतील राजकारण तापले आहे.
कल्याण-कल्याण डोंबिवलीतील समस्या संदर्भात काल भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान त्यांनी मिशन डोंबिवली नसून कमीशन डोंबिवली असल्याची टिका शिवसेनेसह त्यांच्या नेतमंडळीच्या विरोधात केली होती. या टिकेपश्चात शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी शिवसेना ही विकास कामे करते. ती कमीशन खात नसून कमीशन खाण्याची सवय भाजपला असल्याची टिका केली केली आहे.
कालच्या आक्रोश मोर्चात भाजप आमदार चव्हाण यांनी सत्ताधारी शिवसेनेवर सडेतोड टिका केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करताना चव्हाण यांची जीभ घसरली. मोठा गाव पूलासाठी ५ कोटीचा निधी हवा आहे. स्थानिक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांचा हात पकडा नाही तर काही पण काहीपण पकडा तो ५ कोटीचा निधी आणा अशी भाषा वापरली होती. एका आमदाराला ही भाषा शोभत नाही याकडे नगरसेवक म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोटय़ावधी रुपयांची विकास कामे मंजूर करुन आणली आहेत. तसेच ही कामे प्रत्यक्षात आली आहे. काही कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र भाजप आमदार चव्हाण यांनी निवडणूकीच्या तोंडावर ४७२ कोटी मंजूर करुन आणल्याचे सांगत कामाचे नारळ फोडले होते. हा निधी कोणत्या खात्यामार्फत मंजूर करुन आणला होता. निधी मंजूर झाला होता तर त्या निधीतून कामे का झाली नाही. कारण चव्हाण यांच्याकडे ४७२ कोटी निधी मंजूर करुन आणल्याचा कुठलाही पुरावा नाही. त्यांच्याकडे पुरावा असल्यास तो त्यांनी सादर करावा असे आव्हान नगरसेवक म्हात्रे यांनी भाजपला केले आहे. चव्हाण यांनी विकास कामे केली नाहीत. ते विकास कामातील शुक्राचार्य आहे अशी टिका म्हात्रे यांनी चव्हाण यांच्यावर केली आहे. शिवसेना भाजपमधील आरोप प्रत्यारोपावरुन कल्याण डोंबिवलीतील राजकारण तापले आहे.