दोन पक्ष फोडूनही भाजप पराभवाच्या छायेत; आमदार रोहित पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 07:42 AM2023-09-23T07:42:06+5:302023-09-23T07:42:28+5:30
सत्तेसाठी ही फोडाफोडी करून देखील त्यांची परिस्थिती काही सुधारलेली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर शुक्रवारी हल्ला केला
कल्याण : स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपने केलेल्या सर्वेक्षणात लोकसभा निवडणुकीत भाजपची परिस्थिती खराब असल्याचे दिसल्याने भाजप नेत्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. त्यानंतरही भाजपची स्थिती सुधारत नाही हे पाहून भाजपने शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला.
सत्तेसाठी ही फोडाफोडी करून देखील त्यांची परिस्थिती काही सुधारलेली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर शुक्रवारी हल्ला केला. आपण राजकारणात विचार जपण्यासाठी आलो आहोत. नेता होण्यासाठी आलेलो नाही, असा टोलाही त्यांनी आपले काका अजित पवार यांना लगावला. कल्याण येथील स्प्रिंग टाइम हॉटेलच्या सभागृहात इंडिया आघाडीच्या सभेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या सभेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह पदाधिकारी वंडार पाटील, संदीप देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन बासरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, आम आदमीचे धनंजय जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार यांनी लोकलने गाठले कल्याण
पवार यांनी वांद्रे येथून कल्याणच्या सभेला येण्यापूर्वी गुगलवर वाहतुकीची स्थिती जाणून घेतली. तेव्हा तीन तास लागणार असल्याचे दिसल्यावर आपण लोकलने कल्याणला येणे पसंत केले. कल्याणला आल्यावर एका कार्यकर्त्याच्या घरी जाण्यासाठी ४५ मिनिटे लागली तर परत सभेच्या ठिकाणी पोहोचण्याकरीता अर्धा तास लागला, असेही ते म्हणाले.
कोंडीही लक्ष्य
पवार म्हणाले की, ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. त्यांचे चिरंजीव खासदार आहेत. या ठिकाणच्या जनतेशी गप्पा मारल्यावर कळले की या ठिकाणी विकास झालेला नाही. या भागात आराेग्याच्या, वाहतूक कोंडीच्या समस्या आहेत. या सभेला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणार होते. मात्र ते या सभेला आले नाहीत.