केंद्रात मंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी ठाणे जिल्ह्याचा वनवास संपवला : कपिल पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 09:07 PM2021-08-16T21:07:07+5:302021-08-16T21:07:37+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे, कपिल पाटील यांचं वक्तव्य.
मयुरी चव्हाण
"ठाणे जिल्ह्यातील भूमिपूत्रांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. या गोष्टीची कल्पना पंतप्रधानांना आली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे. रामाला तरी १४ वर्षे वनवास भोगावा लागला. मात्र ठाणे जिल्हा ७४ वर्षे वनवास भोगत होता. आता आपल्याला केंद्रात मंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी जिल्ह्याचा हा वनवास संपवला आहे," असे मत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले आहे. या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपाचे भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्याने भाजपामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी ठाण्यामधून भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान कल्याण शीळ मार्गावरही कपिल पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. डोंबिवलीत संघर्ष समितीच्यावतीने त्याच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी वरील विधान केले आहे. पुढे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने आपल्याला केंद्रात काम करण्याची संधी लाभली असून मोदी है तो सब कुछ मुमकिन है असे सांगत त्यांनी भूमिपुत्रांच्या सर्व समस्या आपल्याला माहित आहे. भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम आपण करणार असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे. ठाणे जिल्हा ७४ वर्षे वनवास भोगत होता.
जिल्ह्याचा वनवास संपविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्यातील विविध निवडणूकांमध्ये विशेष करून शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाच्या वतीने प्रामुख्याने कपिल पाटील यांच्या पुढाकाराने रणनीती आखली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.