भाजप नेत्याला महावितरणचा शॉक, दिले अडीच लाखांचे बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 09:59 AM2021-03-20T09:59:28+5:302021-03-20T09:59:57+5:30
कल्याण पूर्व भागात मोरे राहतात. नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिले आकारण्यात आली. या विरोधात भाजपने आंदोलने केली. आंदोलनात मोरे आघाडीवर होते.
कल्याण: वीज वितरण कंपनीने कल्याण पूर्व भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनाच शॉक दिला आहे. मोरे यांना वर्षभराचे घरगुती वीज वापराचे तब्बल २ लाख ५१ हजार रुपये बिल आले आहे. मोरे यांनी वीज वितरण कंपनीच्या अजब कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे.
कल्याण पूर्व भागात मोरे राहतात. नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिले आकारण्यात आली. या विरोधात भाजपने आंदोलने केली. आंदोलनात मोरे आघाडीवर होते.
मात्र, वर्षभराचे त्यांना घरगुती वापराचे एकूण वीज बिल २ लाख ५१ हजार रुपये आले आहे. त्यावर कंपनीने ३० हजार रुपयांचे व्याज आकारले आहे. एकूण बिलापैकी मोरे यांनी १ लाख ९४ हजार रुपये भरले असले तरी उर्वरित थकीत बिल व त्यावरील १० हजार रुपयांचे व्याज शिल्लक आहे.
भाजपने थकीत वीज बिलावर आकारण्यात आलेल्या व्याजाची रक्कम माफ करावी, अशी मागणी उचलून धरली होती. त्यांची ही मागणी मान्य झालेली नाही. त्याचा फटका मोरे यांना बसला आहे.