भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफाेड; कोळसेवाडी पोलिसांनी केली चौघांना अटक
By मुरलीधर भवार | Published: February 20, 2024 06:46 PM2024-02-20T18:46:30+5:302024-02-20T18:46:30+5:30
कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जागेच्या वादातून कल्याण पूर्वेचे शिवसेना शिदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना घडली होती.
कल्याण-भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड केल्या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या चौघांनाही न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जागेच्या वादातून कल्याण पूर्वेचे शिवसेना शिदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना घडली. सध्या महेश गायकवाड आणि त्याचा साथीदार राहूल पाटील याच्यावर ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आमदार गायकवाड यांच्या सह पाच जणांना प्रथम पोलिसांनी अटक केली. त्यांना पहिल्या टप्प्यात १४ दिवसांची पोलिस का्ेठडी होती. त्यानंतर त्यांची रवागनी न्यायालयीन कोठडीत झाली.
सध्या आमदार गायकवाड यांच्यासह पाचही आरोपी तळोजा कारागृहात आहेत. काल सायंकाळी आमदार गायकवाड यांच्या केबल कार्यालयाबाहेर एक कर्मचाऱ््याची बाईक उभी होती. या बाईकमध्ये एक तरुणाने चावी टाकली. कार्यालयातील एक व्यक्ती बाहेर त्याने त्याला काय करतो असे हटकले असता त्याने त्याला शिव्या घालण्यास सुरुवात केली. त्याने काही साथीदारांना बोलावून घेतले. साथीदार एका महागड्या कारमधून आले. त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. मयूर चव्हाण, व्यंकटेश कोणार, करण गुप्ता, स्वरुप सोरटे या चौघांची नावे आहे. तोडफोड करण्यात आलेले केबलचे कार्यालय हे आमदार गायकवाड यांच्या भावाचे आहे असे सांगण्यात आले.