छ.संभाजी महाराजांचा फोटो लावून शिवसेनेनं दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा; भाजपानं काढला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 02:55 PM2022-03-22T14:55:51+5:302022-03-22T14:56:16+5:30

हिंदुत्वाचा मुखवटा घालून उसनवार लोक घेऊन शिवसैनिक बनवले असल्यानं हिंदुत्वाचा अस्सल डीएनए यांच्या रक्तात येईल कुठून? असा प्रश्न भाजपानं विचारला आहे.

BJP Ravindra Chavan Criticized Shivsena Over Shivjayanti Poster Issue, Wrong banner published in Dombivali | छ.संभाजी महाराजांचा फोटो लावून शिवसेनेनं दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा; भाजपानं काढला चिमटा

छ.संभाजी महाराजांचा फोटो लावून शिवसेनेनं दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा; भाजपानं काढला चिमटा

googlenewsNext

डोंबिवली – शिवजयंतीनिमित्त शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो असलेले बॅनर्स संपूर्ण डोंबिवली शहरात झळकावले. ही फार मोठी चूक असून शिवसेना हिंदुत्वाचा डीएनए विसरली असल्याची खोचक टीका भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. डोंबिवलीत घडलेल्या या प्रकारानंतर शिवसेनेवर भाजपाने टीकास्त्र सोडलं.

आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले की, शिवसेनेच्या सर्व उच्चपदावर असेलेल्या मंडळींचा पिंडच मुळात शिवसेनेचा नाही, दुसऱ्या पक्षातून उसनवार घेतलेली ही सर्व मंडळी आहेत. किंबहुना यांना हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हे माहितच नाही. परंतु आज एखादा खरा शिवसैनिक त्या शिवसेना शहर प्रमुखासारख्या महत्वाच्या पदावर असता तर ही चूक घडली नसती. या बॅनरवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही नाव असून आता तरी त्यांचे डोळे उघडले आहेत की नाही हे पाहण्याची गरज असा टोला त्यांनी लगावला.

तसेच आपल्या रक्तात श्वासात नसानसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवरायांचं हिंदवी स्वराज्य हीच आपली ओळख आहे, असं असताना आयाराम शिवसैनिक असणाऱ्या शहरप्रमुखांनी शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज नव्हे तर शंभूराजेंचे फोटो लावले. हिंदुत्वाचा मुखवटा घालून उसनवार लोक घेऊन शिवसैनिक बनवले असल्यानं हिंदुत्वाचा अस्सल डीएनए यांच्या रक्तात येईल कुठून असा सवालही आमदार रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेला विचारला.

शिवसेनेची दिलगिरी, भाजपाला प्रतिटोला

डोंबिवलीतील १-२ बॅनरवर नजरचुकीने छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आला. त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. मात्र भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. शहरप्रमुख पदी कोणाला बसवायचे हा आमच्या पक्षाचा प्रश्न आहे. शिवसेनेकडून काल शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली 'न भूतो न भविष्यती' अशी मिरवणूक बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असावी. आमच्या रक्तात हिंदुत्व असून त्यांनी आम्हाला शिकवू नये असा प्रतिटोला डोंबिवली शहरप्रमूख राजेश मोरे यांनी भाजपाला लगावला आहे.

दरम्यान, भाजपाने कधी शिवजयंती साजरी केलेली आपण पाहिले नाही. बॅनर लावले नाही. त्यामुळे अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. अशा प्रकरणात तरी किमान राजकारण करू नये, विकासाबद्दल न बोलता विषय भरकटवण्याचा  त्यांचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही शिवसेनेने केला.

 

Web Title: BJP Ravindra Chavan Criticized Shivsena Over Shivjayanti Poster Issue, Wrong banner published in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.