कल्याणमध्ये शिवसेनेसोबत काम करणार नाही, भाजपचा ठराव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 08:43 AM2023-06-09T08:43:36+5:302023-06-09T08:44:54+5:30
वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करा; मगच एकत्र काम
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : लोकसभा निवडणुकीआधीच शिवसेना-भाजपमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे चित्र गुरुवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही, तोपर्यंत शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव भाजपने कल्याण जिल्ह्याच्या लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत केला. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांना वाटते तेवढी त्यांची लोकसभा निवडणूक सोपी नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आतापर्यंत चर्चा होणे आणि प्रत्यक्ष ठराव करण्यापर्यंत विषय जाणे हे गंभीर असल्याचे मत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
कल्याण लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आढावा बैठक घेतली. त्यामध्ये मंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षे कार्यकाळपूर्तीच्या निमित्ताने अभिनंदन ठराव प्रस्ताव ठेवला. त्याला उपस्थित शेकडो पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद पवार, नेते जगन्नाथ पाटील, आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. त्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी बागडेंची बदली होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचे काम न करणे, कार्यक्रमात सहभागी न होणे असा प्रस्ताव सूचक नात्याने मांडला, त्याला सर्वांनुमते अनुमोदन देण्यात आले आणि तो ठराव पारित करण्यात आला.
‘सहकार्यासाठी एकत्र यावे’
आगरी-कोळी वारकरी भवनच्या भूमिपूजन सोहळ्यालादेखील मंत्री चव्हाण अनुपस्थित राहिले. जर ते मंत्री म्हणून केवळ भाजप कल्याण जिल्ह्याचा निर्णय म्हणून तेथे जाणे टाळत असतील, तर येथील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, आदींनीदेखील आपल्याच सहकाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकत्र यायला हवे. मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राजकीय आकसापोटी हा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस अधिकाऱ्यांनी नि:पक्षपणे कार्यरत असायला हवे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे बागडे या व्यक्तीविरुद्ध नव्हे तर प्रवृत्तीला विरोध असल्याचे या वेळी सांगण्यात आले.