कल्याण कोणाचे? भाजप- शिवसेनेची परस्परांवर कुरघोडी, युतीतच रंगतेय महानाट्य

By अनिकेत घमंडी | Published: June 8, 2023 06:31 AM2023-06-08T06:31:09+5:302023-06-08T06:33:06+5:30

ठाणे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे भाजपला शिरकाव करू देण्यास तयार नाहीत.

bjp shiv sena is grappling with each other the big drama is unfolding in the alliance for kalyan lok sabha | कल्याण कोणाचे? भाजप- शिवसेनेची परस्परांवर कुरघोडी, युतीतच रंगतेय महानाट्य

कल्याण कोणाचे? भाजप- शिवसेनेची परस्परांवर कुरघोडी, युतीतच रंगतेय महानाट्य

googlenewsNext

अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील दुसरा प्रभावी मानला जाणारा कल्याणलोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या ठाकरे गटाला दिल्याने तेथे शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटात थेट लढत होणार, हे स्पष्ट आहे. दोन वेळा शिवसेनेचे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्याशी तेवढीच तुल्यबळ लढत देऊ शकेल, असा उमेदवार ठाकरे गटाने सध्या तरी समोर आणलेला नाही. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी मात्र गेल्या आठवड्यात शक्तिप्रदर्शन करत लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे फलक लावले आहेत. 

शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप यांच्यात सारे आलबेल असल्याचे दाखवत महाविकास आघाडीप्रमाणेच एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय दिल्लीत घेण्यात आला असला, तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष परस्परांवर कुरघोडीची एकही संधी सोडण्यास तयार नाहीत. ठाणे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे भाजपला शिरकाव करू देण्यास तयार नाहीत. त्यासाठी कधी त्यांनी मुंब्रा-कळव्यात जितेंद्र आव्हाड यांच्याशी जुळवून घेतले, तर कधी कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील यांच्या आग्रहाला मान दिला. भाजपनेही कारखाने, रेल्वे, रस्ते, विकासकामे यावरून शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी सोडलेली नाही. 

त्याला कारणही तसेच आहे. भाजपच्या  विस्तारासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याणमध्ये भेटीगाठी सुरू ठेवल्याने शिंदे गटात अस्वस्थता होती. नुकत्याच दिल्लीत झालेल्या एकत्रित निवडणूक लढवण्याच्या चर्चेनंतर ती शमली असावी. कारण लगोलग श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला कमालीचा वेग आला आहे. त्यांनी विकासपुस्तिका काढत ती घरोघर पोहोचवली. त्यात युती म्हणून भाजपला स्थान दिलेले नाही.

भाजपची साथ निर्णायक

कळवा- मुंब्रा येथे राष्ट्रवादी, कल्याण ग्रामीणमध्ये मनसे, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर या तिन्ही ठिकाणी भाजप आणि केवळ अंबरनाथ विधानसभेत शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय शिंदे गटाचा खासदार निवडून येणे अशक्य आहे.

चव्हाण, परांजपे लढणार का?

संपूर्ण कोकण पट्ट्यात रवींद्र चव्हाण यांचा संपर्क आहे. युतीच्या मागील मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री, तर सध्या कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची भूमिका सोडून ते केंद्राच्या राजकारणात जातील का, हा प्रश्न आहे. कल्याण मतदारसंघात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे लढतील, अशीही चर्चा अधूनमधून सुरू होते. परांजपे यांनी आधी कल्याण, नंतर ठाणे लोकसभा लढवली होती. त्यामुळे आता पुन्हा कल्याणमधून लढण्यास ते उत्सुक नसल्याचे सांगितले जाते. शिवाय एक निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीने स्वतःहून शिवसेनेला दिलेल्या मतदारसंघात ते का लढतील, हाही मुद्दा आहे.

अनुराग ठाकूर यांचा दौरा दबावासाठी?

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे कल्याण लाेकसभा मतदारसंघांत झालेले दौरे सुरुवातीला शिंदे गटाच्या उमेदवाराला अस्वस्थ करणारे ठरले. ठाकूर हे केंद्राला काय अहवाल देतात व भाजप श्रेष्ठी मतदारसंघ बदलाबाबत ऐनवेळी काय भूमिका घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. मात्र, शिंदे गटाने ठाणे किंवा कल्याणपैकी एक मतदारसंघ भाजपसाठी सोडावा, यासाठीचे दबावतंत्र म्हणून ठाकूर यांचा दौरा होता असा शिंदे गटाचा अंदाज आहे.
 

Web Title: bjp shiv sena is grappling with each other the big drama is unfolding in the alliance for kalyan lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.