भाजप-शिवसेनेत पोस्टर'वॉर', 'आम्ही करून दाखवलं तर तुम्ही गाजर दाखवलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 12:58 PM2022-02-25T12:58:28+5:302022-02-25T12:59:27+5:30
शिवसेनेने बॅनरमध्ये आम्ही करून दाखवले तुम्ही गाजर दाखवलं, तीन वेळा आमदार, तीन वर्षे मंत्री राहिलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी, डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा, तीन कामे तरी दाखवा असं आवाहन करण्यात आलंय
डोंबिवली - राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघत असताना कल्याण डोंबिवली शहरात सुद्धा सेना भाजप मधील वाद विकोपाला गेला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी आहेत असा आरोप करत शिंदे यांच्याविरोधात डोंबिवली शहरात बॅनरबाजी केली होती.त्यानंतर आज सेनेनं सुद्धा बॅनरबाजी करत भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांना टार्गेट केलंय. त्यामुळे शहरात निवडणुकीच्या तोंडावर बॅनरवॉर चांगलंचं तापलेलं दिसतंय.
शिवसेनेने बॅनरमध्ये आम्ही करून दाखवले तुम्ही गाजर दाखवलं, तीन वेळा आमदार, तीन वर्षे मंत्री राहिलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी, डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा, तीन कामे तरी दाखवा असं आवाहन करण्यात आलयं. इतकंच नाही तर गाजराचा फोटो देखील लावण्यात आलाय. मात्र, अवघ्या काही तासाभरातच हे बॅनर केडीएमसीनं पोलिसांच्या मदतीनं काढले. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं होतं. पालक मंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खळबळजनक आरोप चव्हाण यांनी केला होता. यानंतर डोंबिवलीत या आशयाचे बॅनर देखील भाजपकडून लावण्यात आले होते. याला आता सेनेनं बॅनर लावून प्रत्युत्तर दिलं आहे.
या बॅनरवर एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे त्यावर फक्त 2 वर्षाच्या काळात 1690 कोटीचे प्रकल्प मार्गी लावून दाखवले असं लिहत कामांची यादी टाकण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला तीन वेळा आमदार तीन वर्षे मंत्री राहिलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी, डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा, तीन कामे तरी दाखवा असं आवाहन करत गाजराचा फोटो आहे. भजपाचे बॅनर लागलीच हटवण्यात आले होते. त्यामुळे सेनेच्या बॅनरबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र, हे बॅनर सुद्धा लागलीच हटवण्यात आले. राजकीय पक्षांच्या या बॅनरबाजीमुळे पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढलीये.