भाजपा महाराष्ट्राचे मंत्रालय देखील गुजरातला नेईल, आदित्य ठाकरे यांची टीका
By मुरलीधर भवार | Published: April 30, 2024 04:07 PM2024-04-30T16:07:11+5:302024-04-30T16:08:08+5:30
युवा नेते ठाकरे हे कल्याण लोकसभेतून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज आज डोंबिवली क्रिडा संकुलातील निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आला.
कल्याण : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेऊन ठेवले आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे बोलतो. आम्ही जर महाराष्ट्राच्या हिताचेच बोललो नाही तर भाजप महाराष्ट्राचे मंत्रालय गुजरातला नेऊन ठेवतील अशी टिका उद्ववसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
युवा नेते ठाकरे हे कल्याण लोकसभेतून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज आज डोंबिवली क्रिडा संकुलातील निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आला. या प्रसंगी काढण्यात आलेल्या मिरवणूकीत युवा नेते ठाकरे सहभागी झाले होते. या प्रसंगी त्यांनी उपरोक्त टिका केली. कल्याण लोकसभेतून आम्ही सर्व सामान्य उमेदवार दिला आहे. वैशाली दरेकर यांचे काम सगळयांनाच माहिती आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी जनता रस्त्यावर आली आहे, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.
आमची लढाई अपक्षांसोबत - वरुण सरदेसाई
कल्याण लोकसभा मतदार संघातून खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून प्रचंड मताधिक्याने निवडून येण्याचा दावा केला जात आहे. यावर उद्धव सेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी सांगितले की, महायुतीने या मतदार संघातून खासदार शिंदे यांची उमेदवारीच घोषित केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची लढाईही अपक्षांसोबत आहे, असे वक्तव्य करुन खासदार शिंदे यांना चिमटा काढला आहे. सामान्य महिला कार्यकर्ता वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्याने जनता त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला आहे.
भटकती आत्माची ताकद काय आहे, हे त्यांना आता कळेल - जितेंद्र आव्हाड
मोदी हे स्वत: घाबरल्यासारखे आहेत. त्यांनी काल जे भाषण केले. त्यात त्यांनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटले आहे. इतक्या खालच्या दर्जाचे भाषण आजपर्यंत कोणाचेही झाले नव्हते. एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याला भटकती आत्मा म्हणतात. या प्रकारची टीका करणे म्हणजे त्यांना शरद पवारांचा मृत्यू अभिप्रेत आहे का? असा सवाल महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित करीत मोदी यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. भटकती आत्म्याची ताकद काय आहे. हे निवडणूकीच्या निकालानंतर कळणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.