भाजपाकडून शिवसेना नेत्यांवर होणारे आरोप केवळ प्रसिद्धीसाठी, शहरप्रमुख राजेश मोरेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 03:41 PM2021-05-31T15:41:29+5:302021-05-31T15:42:20+5:30
KDMC Politics: डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर केले जाणारे आरोप हे केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा पलटवार शिवसेनेने भाजपवर केला आहे.
कल्याण - गेल्या काही दिवसात कल्याण डोंबिवली शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून या राजकीय आखाड्यात शिंदे विरुद्ध चव्हाण असा थेट सामना रंगला आहे.डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर केले जाणारे आरोप हे केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा पलटवार शिवसेनेने भाजपवर केला आहे. विविध मुद्दे घेऊन आमदार चव्हाण यांच्याकडून पालकमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. यावर आज शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावत रविंद्र चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे.
भाजपाचेच राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी डोंबिवलीला सर्वात घाणेरडे शहर असे का म्हटले? कोरोना काळात चव्हाण यांनी काय काम केले? असे प्रश्न मोरे यांनी उपस्थित केले आहेत. तसेच गेल्या 11 वर्षांपासून आमदार चव्हाण हे डोंबिवलीत आमदार आहेत. मात्र या कार्यकाळात त्यांनी डोंबिवलीसाठी केलेले एक तरी विधायक काम दाखवून द्या असे सांगत त्यांनी थेट भाजपाला आव्हान केले आहे.
आपल्यानंतर राजकारणात आलेल्या आणि खासदार झालेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मिळत असणारा लोकांचा पाठींबा पाहून त्याच्या आकसापोटी आमदार चव्हाण यांच्याकडून असले आरोप होत असल्याचेही राजेश मोरे म्हणाले. तर कचरा शुल्क लागू केल्याप्रश्न चव्हाण यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे राजेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ झाल्याने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यासाठीही चव्हाण यांनी कधी तरी बॅनरबाजी करावी असा टोलाही कदम यांनी लगावलाय. या सर्व घडामोडी पाहता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीत सेना आणि भाजप यांच्यात आणखी कडवट संघर्ष निर्माण होईल यात काही शंका नाही.