मालमत्ताकर थकवल्याने पालिकेने ४३० गाळे केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:46 AM2021-03-03T00:46:35+5:302021-03-03T00:46:43+5:30
दहा दिवसांत कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मालमत्ताकर थकविल्याने ४३० गाळ्यांना केडीएमसीने सील ठोकले आहे. मागील १० दिवसांत ही कारवाई केली असल्याची माहिती करवसुली विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी यांनी दिली आहे.
थकबाकीदारांनी थकीत मालमत्ताकर भरावा, यासाठी महापालिकेने १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरदरम्यान अभय योजना जाहीर केली होती. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने तिला १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या योजनेमुळे थकबाकीदारांचे ७५ टक्के व्याज माफ होणार होते. मात्र, या योजनेची मुदत संपल्यावर तिचा लाभ न घेतलेल्या थकबाकीदारांपैकी पाच हजार ७०१ व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविल्या होत्या. त्यानंतरही कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल, अशी नोटीस मालमत्ता विभागाने बाजवली आहे.
या नोटिशीला प्रतिसाद न दिल्याने ४३० गाळ्यांना सील लावले आहे. मागील १० दिवसांत ही कारवाई केली गेली आहे. यात प्रामुख्याने कल्याण पश्चिमेतील विश्व डेव्हलपर्स यांच्या मालकीची व वीएलसीसीसी यांना भाडेतत्वावर दिलेल्या मिळकतीचा समावेश आहे. या मिळकतींच्या मालमत्ताकरापोटी एक कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
पालिकेचे आवाहन
अभय योजना जाहीर करूनही या योजनेचा लाभ न घेतलेल्या आस्थापनांच्या विरोधात महापालिकेची कारवाई सुरूच राहणार आहे. कराचा भरणा करून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या करवसुली विभागाकडून करण्यात आले आहे.