कुटुंबावर पाच वर्षे बहिष्कार; जमिनीच्या वादातून पंचांनी उचलले पाऊल
By सचिन सागरे | Published: June 2, 2023 09:19 AM2023-06-02T09:19:38+5:302023-06-02T09:19:45+5:30
व्यवसाय ठप्प,आर्थिक कोंडी
सचिन सागरे
कल्याण : गावात लग्नकार्यात आता त्यांना बँड वाजवायला कुणी बोलावत नाही. मासेविक्रीच्या व्यवसायासाठी मुंबईतून मासे आणायला जाताना गावातील लोक सोबत घेत नाहीत. त्यांच्या मुलांना गावातील मुले खेळायला घेत नाहीत. असे जगणे कल्याण पश्चिमेतील कोळीवाड्यात राहणारे प्रकाश विष्णू भोईर (६७) व त्यांचा लहान भाऊ विजय भोईर (६५) यांचे कुटुंब २०१८ पासून म्हणजेच पाच वर्षांपासून जगत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी विनविण्या केल्या, पण काहीच उपयोग न झाल्याने हे कुटुंबीय मानसिक व आर्थिक विवंचनेत आहेत.
मालकीच्या व वहिवाटीच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाचा कायदेशीर मार्गाने विरोध केल्याने हा बहिष्कार घातल्याचे भोईर कुटुंबाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे बहिष्कार घालण्यात आला नसल्याचे पंच कमिटी म्हणते.
पंच कमिटीच्या प्रमोद किसन भगत व राम गजानन भोईर यांच्यासह सदस्यांनी बहिष्कार टाकल्याचा अर्ज बाजारपेठ पोलिस तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तृप्ती पाटील यांना दिला होता, . त्यानंतर, आमच्यासह पंच कमिटीची एकत्रित बैठक बोलावली. मात्र, पंच कमिटीने बंदी उठविण्याचे पोलिसांना दिलेले आश्वासन काही दिवसांपुरतेच राहिले. पुन्हा त्रास सुरू झाल्याचे भोईर म्हणाले.
समाजाच्या ट्रस्टच्या मंदिराच्या जागेचा प्रश्न जोडून गावातील लोकांची दिशाभूल केली जात आहे. बहिष्काराची तक्रार पोलिसांकडे करू नये म्हणून पंचांसह त्यांचे हस्तक आमच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात खोट्या तक्रारी करीत आहेत. मुलाच्या लग्नासाठी गावातील एकही जण आला नाही. यावेळी आमच्या घरावर दगडफेकही झाली होती.
विजय भोईर
याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी बाजारपेठ पोलिसांना मी व उत्तम जोगदंड यांनी २०२१ मध्ये सांगितले होते. परंतु, त्यावेळी पंच आणि पीडित कुटुंबांची एकत्र बैठक घेऊन बहिष्काराचा प्रश्न मिटवला होता. सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या पंचांवर गुन्हा दाखल न झाल्याने त्यांना धाक नाही.
वकील तृप्ती पाटील,
अंनिस, कायदा विभाग सहसचिव.
जमिनीचा वाद निर्माण झाला होता. मात्र, हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला आहे.
देवानंद भोईर,
उपनेते, कोळी महासंघ राज्य
भोईर कुटुंबीयांवर बहिष्कार टाकलेला नाही. गावातील सर्व कार्यक्रम आणि पालखी आणि भजनातही त्यांचा सहभाग असतो.
प्रमोद किसन भगत,
अध्यक्ष, पंच कमिटी.
भोईर कुटुंबीयांचे आरोप खोटे आहेत. त्यांना गावातील सर्व कार्यक्रमांत बोलावले जाते. तसेच, त्यांच्या सुख-दु:खात गावकरी सहभागी होत असतात.
राम भोईर,
सदस्य, पंच कमिटी
या प्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाकडे पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सागितले. दरम्यान, हे प्रकरण काही दिवसांपूर्वी सामोपचाराने सोडविण्यात आल्याचे बाजारपेठ पोलिसांचे म्हणणे आहे.