"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
By मुरलीधर भवार | Published: November 16, 2024 09:17 PM2024-11-16T21:17:54+5:302024-11-16T21:18:16+5:30
महाराष्ट्र को लूटेंगे और दोस्तो मे बाटांगे हा नारा देणाऱ्यांच्या विरोधात मी उतरलो आहे - उद्धव ठाकरे
Kalyan West Assembly Constituency : कल्याण-ही निवडणूक माझ्या अस्तित्वाची नसून महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे. लोकसभेत त्यांना गुडघ्यावर आणले. आत्ता त्यांना पाताळात गाडणार, असा इशारा उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे महायुतीस दिला आहे.
उद्धव सेनेतर्फे कल्याण पूर्व मतदार संघातून मतदार संघातून निवडणूक लढवणारे उमेदवार धनंजय बोडारे, कल्याण पश्चिमेतून निवडणूक लढविणारे उमेदवार सचिन बासरे आणि अंबरनाथ मतदार संघातील उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारार्थ आज कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात पक्ष प्रमुख ठाकरे यांची जाहिर सभा पार पडली. या प्रसंगी त्यांनी महायुतीस उपरोक्त इशारा दिला. या प्रसंगी शिवसेनेचे सचिन विनायक राऊत, पदाधिकारी अल्पताफ शेख, गुरुनाथ खोत, विजय साळवी, अल्पेश भोईर, जयेश वाणी, राष्ट्रवादीचे महेश तपासे आदी मान्यवर उपस्थित होते.
"एक खासदार ज्याला घरात बसून खासदारकी मिळाली. त्याने जाहिरातबाजी करुन कसा विकास केला आहे हे सांगत आहे. सभेला येत असताना रस्ते धुळीने खडड्यांनी भरलेले आहेत. वाहतूक कोंडी आहे. त्यांना पैशाचा माज आहे. केलंय काम भारी आत्ता पुढची तयारी अशी जाहिरात त्यांच्याकडून केली जात आहे. पुढची तयारी म्हणजे मोठी गद्दारी," अशी टिका ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा नामोल्लेख न करता केली.
"माझ्या हिंदूत्वाविषयी बोलणाऱ्यांनी मला हिंदूत्व शिकवू नये. नरेंद्र मोदी नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापतात. त्यांचे कसले हिंदूत्व. भाजपने माझ्याशी विश्वासघात केला. त्यांना धडा शिकविण्याकरता मी महाविकास आघाडीत गेलो. महाराष्ट्र खड्ड्यात घातला आहेच. त्याला बाहेर काढण्यासाठी ही मशाल पेटणार आहे. महाराष्ट्र को लूटेंगे और दोस्तो मे बाटांगे हा नारा देणाऱ्यांच्या विरोधात मी उतरलो आहे. मी त्यांना महाराष्ट्र लूट देत नव्हतो. त्यामुळे त्यांनी माझे सरकार पाडले. यांना सगळ्यात आधी मी मंत्री पद दिले. अन्यथा ते मुख्यमंत्री झाले नसते. ते गद्दारी करुन मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मुलालाही खासदारकीच्या बोहल्यावर मी चढविले. त्यांना मोठे करणारे लोक आजही माझ्या सोबत आहे. ते त्यांना पुन्हा लहान करु शकतात," असेही ठाकरे म्हणले.
१५०० रुपये देऊन बहिणीना नोकर समजता का ? १५ ०० रुपये दिले. महागाईतून लूट केली. त्याचा काय उपयोग याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.
अखंड उपमुख्यमंत्री भव:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाढीवाला असा उल्लेख करीत सरकार कुठेही असो. त्यात उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांना मिळते. त्यांना अखंड उपमुख्यमंत्री भव: अशा आर्शीवाद मिळाला असल्याची टिका ठाकरे यांनी यावेळी केली.
त्यांची सुद्धा अवस्था माझ्या सारखीच
कल्याण पूर्व मतदार संघातील उमेदवार बोडारे हे उद्धव सेनेत आहेत. तर त्यांचे भाऊ चंद्रकांत बोडारे हे शिंदे सेनेत आहेत. धनंजय बाेडारे यांची अवस्था सुद्धा माझ्या सारखीच आहे. त्यांचा एक भाऊ दुसऱ््या पक्षात आहे असे ठाकरे यावेळी म्हणाले.