बिल्डरने भरले पाच कोटी ४७ लाख रुपये; अभय योजनेचा फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 12:46 AM2020-12-01T00:46:21+5:302020-12-01T00:46:39+5:30
थकीत ओपन लॅण्डच्या करापोटी वाचले चार कोटी
कल्याण : केडीएमसीने मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ घेत बिल्डर जोहर झोझवाला यांनी पाच कोटी ४७ लाख रुपयांचा भरणा महापालिकेत केला आहे. मनपाला त्यांच्याकडून थकबाकीपोटी नऊ कोटी ७० लाख रुपये येणे होते. मात्र, त्यांनी अभय योजनेचा फायदा घेतल्याने त्यांचे चार कोटी २३ लाख रुपये वाचले आहेत.
झोझवाला यांनी पाच कोटी ४७ लाखांचा धनादेश केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मालमत्ताकर वसुली विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी उपस्थित होते. बारावे य़ेथील गोदरेज पार्क येथील ओपन लॅण्डवर झोझवाला यांना बांधकाम प्रारंभपत्र देण्यात आले आहे. त्यांच्याकडून २०१४ पासून थकीत रक्कम महापालिकेस येणे बाकी होती. मात्र, त्यांनी अभय योजनेचा फायदा घेतला आहे. या योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असून, त्याचा लाभ अन्य मालमत्ता थकबाकीदारांनीही घ्यावा, असे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
१०० कोटींची थकबाकी
ओपन लॅण्ड कराच्या थकबाकीपोटी किमान १०० कोटींची थकबाकी आहे. महापालिकेच्या मालमत्तावसुली पथकाने १५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबरदरम्यान ३४ कोटी १९ लाख रुपये वसूल केले होते. त्यानंतर चार दिवसांत १० कोटी ५८ लाख रुपये वसूल केले. आता झोझवाला यांनी पाच कोटी ४७ लाख रुपये भरले आहे. त्यामुळे एकाच दिवसात इतक्या मोठ्या रकमेची वसुली झाली आहे.