कोट्यवधींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचे अपहरण; १२ तासांत १० जणांच्या टोळीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 08:15 AM2024-09-26T08:15:57+5:302024-09-26T08:16:07+5:30
व्यावसायिकाच्या मुलाचे ४० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना
अंबरनाथ : येथील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे ४० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुद्देमाल, टोळीतील म्होरक्या देवीदास वाघमारे, दत्तात्रय पवार यांच्यासह आठ जणांना गजाआड केले. मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.
अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिक संजय शेळके यांच्या २० वर्षीय मुलाचे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास काही अनोळखी व्यक्तींनी अपहरण केले होते. आरोपींनी कार आडवी घालून मुलाला गाडीत घालून त्याचे अपहरण केले. त्यानंतर शेळके यांच्याकडे मोबाइलवरून ४० कोटींच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास मुलाला मारण्याची धमकीही दिली होती. दोन कोटी एका कारमध्ये ठेवून त्या कारचा नंबर पाठवण्यासही शेळके यांना सांगितले. कारच्या पाठोपाठ पोलिस पाठलाग करत होते. मात्र, पोलिस असल्याचा संशय आल्याने मुलगा काही वेळात परत येईल, असे सांगितले आणि मोबाइल बंद केला.
पैसे परत करण्यासाठी रचला अपहरणाचा कट
त्यातील वाघमारे आणि पवार यांनी मुंबई पालिकेत अग्निशमन दलात नोकरभरतीमध्ये अनेक तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आठ ते दहा लाख याप्रमाणे दोन कोटी ७५ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती. उमेदवारांचे घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्यांनी शेळके यांच्या मुलाच्या अपहरणाचा कट रचला होता.
मुलाची सुखरूप केली सुटका
अपहरणकर्ते खंडणीची रक्कम न घेताच निघून गेल्याने घटनेचे गांभीर्य वाढले. याचवेळी अपहरणकर्त्यानी वापरलेल्या मोबाइल नंबरचा तांत्रिक तपास केला. लोकेशन भिवंडीजवळील पिसे डॅमजवळ असल्याचे आढळले. निखिल लबाना याला ताब्यात घेऊन विचारणा केली. त्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरली आणि अपहरण प्रकरणातील दहा जणांना अटक केली.