ऐकावे ते नवलच! उल्हासनगरच्या बिल्डरने केली चंद्रावर जमीन खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 05:42 AM2020-11-18T05:42:11+5:302020-11-18T05:45:02+5:30
Land on Moon: असा व्यवहार करणारी देशातील चौथी व्यक्ती. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर खरेदीची पावती मिळाली असून, त्यासोबत बीएसएनएल कंपनीकडे १ लाख ७० हजारांचा भरणा केल्यानंतर एक सॅटेलाइट फोन मिळाला.
सदानंद नाईक:
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : चित्रपट क्षेत्रात वावर असलेल्या व व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक राम वाधवा यांनी सॅटेलाइट फोनसह चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत, अभिनेता शाहरूख खान तसेच आग्रा येथील एका व्यक्तीने चंद्रावर जमीन खरेदी केली असून, वाधवा यांचा देशात चौथा क्रमांक आहे.
उल्हासनगर यूएसए म्हणून देशात प्रसिद्ध असून बांधकामासह इतर क्षेत्रांत शहरातील अनेकांनी नावलौकिक मिळविला आहे.
चित्रपट क्षेत्रात वावर असलेले व व्यवसायाने बिल्डर असलेले
वाधवा यांनी दिवाळीपूर्वी शहरवासीयांना गुड न्यूज दिली. भविष्याच्या दृष्टिकोनातून चक्क चंद्रावर ४३ हजार ५०० स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर जागा त्यांनी खरेदी केली. चंद्रावरील जमिनीच्या व्यवहारासाठी त्यांनी जयपूरमधील सुरभी असोसिएट या कंपनीला जमीन खरेदीचे काम दिले होते.
पैसे भरल्यानंतर सॅटेलाइट फोन मिळाला
कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर खरेदीची पावती मिळाली असून, त्यासोबत बीएसएनएल कंपनीकडे १ लाख ७० हजारांचा भरणा केल्यानंतर एक सॅटेलाइट फोन मिळाला. समुद्र, जंगल हेच काय जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून या फोनचा संपर्क होणार असून आउट गोइंगचा दर मिनिटाला ३५ रुपये असल्याची माहिती वाधवा यांनी पत्रकारांना दिली. मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जमीन खरेदी केल्याची माहिती वाधवा यांनी देऊन सॅटेलाइट फोनसह चंद्रावरील जमीन खरेदीची कागदपत्रे पत्रकारांना दाखविली.