डोंबिवलीमध्येही मॉडीफाईड सायलेन्सरवर फिरणार रोडरोलर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 09:37 PM2021-06-29T21:37:30+5:302021-06-29T21:39:28+5:30
उद्या केली जाणार कारवाई.
कर्णकर्कश्श आवाज करत बाईक चालवण्यात युवकांना एक वेगळीच क्रेझ असते. मात्र, अशा बाईकसमुळे कधी दिवसा तर बहुतांश वेळा रात्रीच्या वेळेस कानाचे पडदे फाटतील की काय असा विचार अनेकांच्या मनात आल्याशिवाय रहात नाही. अशा कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या बाईक स्वारांना कल्याणच्या वाहतूक पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली होती. त्यानंतर अशी कारवाई सगळीकडे करण्यात यावी अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या. डोंबिवलीमध्येही उद्या सकाळी मॉडीफाईड बुलेट सायलेन्सरवर रोडरोलर फिरवण्यात येणार आहे.
मागील काही दिवसापासून डोंबिवली वाहतूक शाखेच्या वतीने मॉडीफाईड बुलेट सायलेन्सरवर कारवाई सत्र सुरू होते. डोंबिवली व कोळशेवाडी वाहतूक उप विभागामध्ये जवळपास १११ बुलेट वरती कारवाई करून मॉडीफाईड सायलेन्सर काढून घेण्यात आले आहेत.
त्या मॉडीफाईड सायलेन्सर वर म्हसोबा चौक, ९० फिट रोड, डोंबिवली पूर्व या ठिकाणी रोलर फिरवून कायम स्वरूपी निकामी करण्यात येणार असल्याची माहिती डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी "लोकमत"ला दिली आहे. तसेच डोंबिवलीतील ९० फिट परिसरात कायमच बुलेट स्वार सायलेन्सरचा मोठा आवाज करत मोठ्या ऐटीत वावरत असतात. यासंदर्भात देखील अनेक तक्रारी समोर येत आहेत.