बैलगाड्यांच्या शर्यती ग्रामीण भागात सुरूच; कोरोनाचे नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 08:00 AM2021-05-31T08:00:27+5:302021-05-31T08:00:40+5:30
७० जणांविरोधात गुन्हा दाखल
कल्याण : बैलगाड्यांच्या शर्यतींवर बंदी असतानाही कल्याणच्या ग्रामीण भागात त्या सुरू असल्याचे रविवारी पाहायला मिळाले. डोंबिवलीजवळच्या अंतार्ली गावात बैलगाड्यांच्या शर्यतींचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते.
यात शर्यतबंदीचे उल्लंघन झालेच; त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने गर्दी झाल्याने कोरोनाचे नियमही धाब्यावर बसविले गेल्याचे दिसून आले. दरम्यान या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकांत ७० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सद्य:स्थितीला सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जमावबंदीही आहे; परंतु रविवारी सकाळी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही जमावबंदी धाब्यावर बसविली गेल्याचे अंतार्ली गावात झालेल्या बैलगाड्यांच्या शर्यतीतून दिसून आले. ही शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आले होते. कोरोनाचे नियम पायदळी तुडवीत आयोजित करण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना कुणाच्या आशीर्वादाने या बैलगाड्यांच्या शर्यती भरविल्या गेल्या होत्या, हादेखील सवाल उपस्थित केला जात आहे. शर्यती भरविणाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाईची गरज आहे. काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाटणे गावातही बैलगाडीची शर्यत भरविण्यात आली होती.
या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पुन्हा एकदा मानपाडा पोलिसांच्या हद्दीत शर्यतींचे आयोजन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
शर्यती कुणाच्या आशीर्वादाने भरवल्या?
ही शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आले होते. कोरोनाचे नियम पायदळी तुडवीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाकडे पोलिसांचा झालेला कानाडोळाही चर्चेचा विषय ठरला आहे.nग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना कुणाच्या आशीर्वादाने या बैलगाड्यांच्या शर्यती भरविल्या गेल्या होत्या, हादेखील सवाल उपस्थित केला जात आहे.