आता बैलाचा Birthday! कल्याणमध्ये कोरोनाकाळात धुमधडाका सुरुच; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 01:09 PM2021-03-12T13:09:56+5:302021-03-12T13:10:26+5:30
Bull's Birthday celebration: डोंबिवलीच्या मोठागावमध्ये रेतीबंदर रोडला राहणाऱ्या किरण म्हात्रे याने त्याच्या बैलाचा वाढदिवस साजरा केला. यासाठी स्टेज बांधून मित्रमंडळींना मोठ्या संख्येने बोलावले होते. बैलाचा वाढदिवस साजरा करताना या लोकांनी स्टेजवर डान्सदेखील केला.
राज्यात कोरोनाचा आकडा 13 हजार पार झाला आहे. तरीदेखील लोक गांभीर्याने घेत नाहीएत. कल्याणमध्ये जत्रेसारखा लग्नसोहळा केल्याने गुरुवारीच गुन्हा दाखल झालेला असताना आता चक्क बैलाचा वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार घडला आहे. (Bull's Birthday celebration in Dombivli.)
डोंबिवलीच्या मोठागावमध्ये रेतीबंदर रोडला राहणाऱ्या किरण म्हात्रे याने त्याच्या बैलाचा वाढदिवस साजरा केला. यासाठी स्टेज बांधून मित्रमंडळींना मोठ्या संख्येने बोलावले होते. बैलाचा वाढदिवस साजरा करताना या लोकांनी स्टेजवर डान्सदेखील केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर साथरोग प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार 11 मार्चला घडला आहे. किरण एकनाथ म्हात्रे हा तरुण डोबिवली पश्चिम भागात राहतो. त्याने गोवर्धन टॉवरच्या समोरील त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे हा बर्थडे सेलिब्रेट केला. लोकांना जमवून तोंडाला मास्क न लावता निष्काळजीपणे स्वतःचा व इतरांचा जीव माहिती असूनही धोक्यात घातला, तसेच बैलाचा वाढदिवस साजरा केला असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नसोहळ्यास 700 जणांची गर्दी
कल्याण पूर्वेतील 60 फुटी रोड, गॅस कंपनी शेजारी एका लग्न समारंभाला मोठ्या प्रमाणावर लोक आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार 5/ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांच्या पथकाने पाहणी केली असता या लग्न सोहळ्याला सुमारे 700 हून अधिक लोक हजर असल्याचे दिसले. एवढ्या लोकांसोबत लग्न सोहळ्याला परवानगी नसताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आहे. यामुळे पोलिसांनी या विवाह सोहळ्याचे आयोजक राजेश यशवंत म्हात्रे, चिंचपाडा, कल्याण पूर्व, महेश कृष्णा राऊत, कासारवडवली, जि. ठाणे यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम 188, 269, 270, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम51 , तसेच कोविड-19 उपाययोजना नियम 11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.