युएई चलनाच्या बदल्यात मिळाले इंग्रजी पेपरचे बंडल
By प्रशांत माने | Published: November 22, 2023 02:27 PM2023-11-22T14:27:12+5:302023-11-22T14:28:22+5:30
कॅब चालकाची दिड लाखांची फसवणूक: तीन महिलांनी घातला गंडा.
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: युएई देशाच्या २०० चलनी नोटा उपलब्ध करून देतो असे आमिष दाखवित नोटांच्या बदल्यात इंग्रजी पेपरचे कागदी बंडल देत कॅब चालकाची दिड लाखांची आर्थिक फसणुक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
कॅब चालक असलेले राहुल मिश्रा हे टिटवाळा येथे राहतात. त्यांना तीन अनोळखी महिलांनी युएई देशाच्या २०० चलनी नोटा उपलब्ध करून देतो त्यासाठी दिड लाख रूपये लागतील असे सांगितले. नोटा घेण्यासाठी संबंधित महिलांनी राहुल यांना डोंबिवली पुर्वेकडील काटई नाका येथील पेट्रोल पंपाच्या पाठीमागे बोलावले. सोमवारी ते संध्याकाळी सव्वापाच च्या दरम्यान तेथे गेले. महिलांनी दिड लाखांची रोकड घेतली आणि त्याबदल्यात युएई देशाच्या २०० चलनी नोटांचे बंडल असलेली काळी निळी कापडी बॅग त्यांच्याकडे सुपूर्द केले आणि त्या निघून गेल्या. दरम्यान बॅग उघडून बंडल पाहिले असता बंडल खरी नसून ती इंग्रजी न्यूज पेपरचे बंडल असल्याचे निदर्शनास पडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राहुल यांनी थेट मानपाडा पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.