आंबिवलीच्या टेकडीवर साकारणार बटरफ्लाट पार्क, ३ कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 11:58 PM2021-06-11T23:58:42+5:302021-06-11T23:59:16+5:30
सीएसआर फंडातून खर्च केले जाणार पैसे, आयुक्तांनी दिली भेट
कल्याण-आंबिवलीनजीक असलेल्या 40 एकराच्या टेकडीवर १५ हजार झाडे लावण्यात आली आहे. त्याठिकाणी सीएसआर फंडातून ३ कोटी रुपये खर्च करुन बटरफ्लाय, बी आणि बर्ड पार्क उभारले जाणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
आंबिवली टेकडीवरील या वनराईची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी आज केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रख्यात फूलपाखरु तज्ञ आयसॅक केहीमकर, सुब्बलक्ष्मी, उद्यान अधीक्षक संजय जाधव, शहर अभियंत्या सपना कोळी देवनपल्ली आदी उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली महापालिकेने रिंग रोड प्रकल्प विकसीत करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात एका झाडामागे प्रत्येकी पाच झाडे आंबिवली टेकडीवरील ४० एकर जागेत लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार टेकडीवर १५ हजार झाडे लावली आहे. त्यांना दररोज पाणी देऊन वाढविली आहे. तीन वर्षापूर्वी लावलेल्या झाडांचे संगोपन केल्याने त्याठिकाणी वनराई फुलली आहे. नेचर फाऊंडेशन आणि डीसीबी बॅकेच्या संयुक्त विद्यमाने सीएसआर फंडातून ३ कोटी रुपये खर्च करुन बटरफ्ला, बी आणि बर्ड पार्क उभारले जाणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.
भोपर आणि उंभार्णी टेकडीवरही अशा प्रकारची योजना राबविण्याचा मानस आहे. याठिकाणी विविध जातीचे पक्षी येतात. त्यामुळे या ठिकाणी पक्षी निरिक्षणासाठी पक्षी प्रेमी येतील. याठिकाणी हे निसर्गरम्य ठिकाणी आंबिवली टेकडी भविष्यात विकसीत होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. केवळ आंबिवली टेकडीच नाही. वनराई फुललेली नाही. तर महापलिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत गौरी पाडा येथे विकसीत करण्यात येत असलेल्या सिटी पार्कच्या प्रकल्पाच्या ठिकाणीही विविध जातीची ३ हजार झाडे लावली जाणार आहे.
फुलपाखरु तज्ञ केहीमकर यांनी सांगितले की, या ठिकाणी जे बटरफ्लाय, बी आणि बर्ड पार्क सुरु केले जाणार आहे. त्यासाठी पुरक झाडे लावली जाणार आाहेत. पक्षांना आकर्षित करणारी झाडे लावली जाणार आहेत. त्यात भारतीय झाडे जास्त प्रमाणात लावण्यात येणार आहेत. लोक मलेशिया आणि थायलंड येथे बटरफ्लाय पार्क पाहण्यासाठी जातात. त्यांना थायलंड आणि मलेशियाला जाण्यासाठी गरज भासणार नाही. त्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाचे हे नैसर्गिक बटरफ्ला, बी आणि बर्ड पार्क विकसीत होईल.