ऐनवेळी प्लॅटफाॅर्म बदलल्याने दिव्यात लोकल धरली रोखून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 09:38 AM2023-08-10T09:38:45+5:302023-08-10T09:38:54+5:30
संतप्त प्रवाशांनी घातला गोंधळ, कर्मचाऱ्यांनी काढली समजूत
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : दिवा रेल्वे स्थानकात ऐन गर्दीच्यावेळी बुधवारी सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेने प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी दहा मिनिटांहून अधिक काळ लोकल रोखून धरली. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. अखेर प्रशासनाने प्रवाशांची समजूत काढल्यानंतर सेवा सुरळीत सुरू झाली. या वेळी स्थानकात प्रवाशांचा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान महिलेने रेल्वेची चेन खेचल्याने गाड्या खोळंबल्याचे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाने दिले.
सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत दिव्यातील नोकरदार रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर उभे होते. रोज मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल याच प्लॅटफॉर्मवर येते, मात्र आज ही लोकल ट्रेन येण्यास काही मिनिटे उशीर झाला. उशीर झालेली ट्रेननंतर दिवा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आली. चारवर येणारी लोकल ट्रेन दोनवर आल्याने प्रवाशांची मोठी धांदल उडाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर धाव घेतली. ट्रेन समोर उभे राहत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तसेच ही लोकल तब्बल १० ते १५ मिनिटे थांबवून ठेवण्यात आली. रेल्वे स्थानकात गोंधळ झाल्यानंतर आरपीएफ जवानांसह रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर प्रवासी रेल्वे रुळांवरून बाजूला झाले.
मध्य रेल्वेची
वाहतूक उशिराने
दिवा स्थानकात झालेल्या गोंधळानंतर रेल्वेची वाहतूक १५, २० मिनिटे उशिराने धावत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे जलद लोकल भांडूप स्थानकात थांबून होत्या. जलद मार्गावर भांडूप-नाहूर स्थानकादरम्यान काही तांत्रिक अडचणीमुळे २५ मिनिटांपासून लोकल थांबून होत्या. मुंबईकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत होत्या.