गावठी पिस्तुल विकायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला! जिवंत काडतुस देखील जप्त
By प्रशांत माने | Published: March 28, 2024 03:19 PM2024-03-28T15:19:45+5:302024-03-28T15:20:05+5:30
पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस असा एकुण २० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस पथकांची विशेष गस्त सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी डोंबिवली पूर्व भागात सापळा लावून देशी बनावटीचा गावठी पिस्तुल (कट्टा) बाळगणा-या आणि विक्री करण्यासाठी आलेल्या राजु हरीराम तिवारी ( वय ५३) रा. नवी मुंबई यास बुधवारी अटक केली. त्याच्याकडून पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस असा एकुण २० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कल्याण गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार दत्ताराम भोसले आणि पोलिस शिपाई गुरूनाथ जरग यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोंबिवली पुर्वेकडील पाथर्ली रोडलगत, शेलार नाका, बीएसयुपी बिल्डींग परिसरात एकजण देशी बनावटीची गावठी पिस्तुल ( कट्टा) विक्री करण्यासाठी येणार आहे. या मिळालेल्या माहितीनुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण, पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, विश्वास माने, किशोर पाटील, पोलिस नाईक दिपक महाजन, पोलिस शिपाई गुरूनाथ जरग आदिंच्या पथकाने बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास सापळा लावून राजु तिवारीला अटक केली.
दरम्यान आरोपी तिवारी हा गावठी पिस्तुल कोणाला विक्री करण्यासाठी आला होता याची माहीती अदयाप गुलदस्त्यात आहे. कट्टा बाळगणे या आरोपाखाली स्थानिक टिळकनगर पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिवारी विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे.