चोरीचे मोबाईल, बॅटरी विकायला आले आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडले!
By प्रशांत माने | Published: August 15, 2024 05:01 PM2024-08-15T17:01:44+5:302024-08-15T17:01:57+5:30
दोन सराईत चोरटे गजाआड: कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई.
प्रशांत माने/डोंबिवली लोकमत न्यूज नेटवर्क|
डोंबिवली: उघड्या दरवाजावाटे भंगार दुकानातील मोबाईल फोन व वाहनाची बॅटरी चोरणा-या दोघा सराईत चोरटयांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. अनुराग सुनिल मंडराई (वय २०) आणि इरफान बाबु शेख (वय २२) दोघेही रा. डोंबिवली पूर्व अशी अटक केलेल्या चोरटयांची नावे आहेत. दोघेही सराईत चोरटे असल्याची माहीती गुन्हे अन्वेषणचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांनी दिली.
७ ऑगस्टला मध्यरात्री पुर्वेकडील सोनारपाडा परिसरातील एका भंगाराच्या दुकानात उघडया दरवाजावाटे घुसून चोरटयांनी पाच जणांचे मोबाईल आणि एका वाहनाची बॅटरी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता. कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग या गुन्हयाचा समांतर तपास करत असताना सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दोन जण चोरीचे मोबाईल व वाहनाची बॅटरी विक्री करण्यासाठी येणार आहे. या मिळालेल्या माहीतीनुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक पवार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक भोसले, पोलिस हवालदार विश्वास माने, पोलिस नाईक दिपक महाजन, पोलिस कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, उमेश जाधव, सतिश सोनवणे आदिंनी कल्याण शिळफाटा रोडवरील कोळेगाव परिसरात सापळा लावला. बातमीदाराने वर्णन केल्याप्रमाणे दोन व्यक्ती त्याठिकाणी येताच पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्याकडील सामानाची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे भंगाराच्या दुकानातून चोरी केलेले पाच मोबाईल आणि एका तीनचाकी वाहनाची बॅटरी आढळुन आली. दोघांकडून ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार
इरफान आणि अनुराग हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. इरफानवर मानपाडा, रामनगर आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचे १२ गुन्हे दाखल आहेत तर अनुरागवर देखील घरफोडीचे पाच गुन्हे दाखल असल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक पवार यांनी दिली.