धक्कादायक! कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची दारू गांजा पार्टी; व्हिडीओ काढणाऱ्याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 05:29 PM2021-03-28T17:29:19+5:302021-03-28T17:31:03+5:30
डोंबिवली कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांचा शिमगा; पार्टी करणाऱ्यांना कामावरून काढलं
कल्याण: कोविड सेंटरमधील रुग्णांच्या वस्तू चोरीस जाणे, महिलांचा विनयभंग होणे या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. मात्र होळीच्या पूर्वसंध्येला डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड सेंटरमधील कर्मचारीच सेंटर परिसरात दारु गांजा पार्टी करत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दारू गांजा पिण्यास मज्जाव करणाऱ्या तरुणाने त्यांचा व्हिडीओ काढला. याचा राग मनात धरुन कर्मचाऱ्यांनी त्या तरुणालाच बेदम मारहाण केली आहे. दारु गांजा पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने कामावरुन काढून टाकले आहे.
डोंबिवली क्रीडा संकुलात महापालिकेचे कोविड सेंटर आहे. हे कोविड सेंटर एका कंत्राटदारास चालवण्यास दिले आहे. कोविड सेंटरच्याजवळ तांत्रिक कर्मचारी वर्गासाठी एक शेड उभारण्यात आला आहे. याच शेडमध्ये बसून काही कर्मचारी दारू गांजा पार्टी करत असल्याची बाब राजू आलम या तरुणाची लक्षात आली. राजू आलम हा एसी दुरुस्तीचे काम करतो. त्याने कर्मचाऱ्यांना दारू पिण्यास मज्जाव केला. ते दाद देत नसल्याने त्याने त्यांचा व्हिडीओ काढला. दारु गांजा पिणा:या कर्मचाऱ्यांनी राजू आलमलाच बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे कोविड सेंटरमधील गैरप्रकार उघडकीस आला आहे. ही बाब कळताच कोविड सेंटर प्रशासनाने दारू पिणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. मात्र कोविड सेंटर परिसरात एखादा गैर प्रकार घडत असल्यास त्यावर देखरेख ठेवून तो रोखण्याची जबाबदारी महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणोची आहे. सेंटरमधील कामाची वेळ संपल्यावर कर्मचाऱ्यांना आवाराच्या बाहेर काढले जाते असे सेंटर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.