खबरदार नालेसफाईत निष्काळजीपणा केला तर...; युवासेना सचिवाची नालेसफाईच्या ठेकादाराला तंबी
By मुरलीधर भवार | Published: May 17, 2023 04:31 PM2023-05-17T16:31:27+5:302023-05-17T16:32:05+5:30
महापालिकेकडून नाले सफाईचे काम पावसाळ्या पूर्वी केले जाते.
डोंबिवली-नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा केला तर कडक कारवाई केली केली जाईल अशी तंबी नालेसफाईचे काम करणाऱ््या ठेकेदाराला शिवसेनेचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. म्हात्रे यांनी आज एमआयडीसी परिसरातील नालेसफाईची पाहणी केली. दोन दिवसानंतर पुन्हा कामाची पाहणी केली जाईल असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेकडून नाले सफाईचे काम पावसाळ्या पूर्वी केले जाते. महापालिकेने नालेसफाईच्या कामाची निविदा काढली होती. ठेकेदारांनी महापालिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याने महापालिकेने संबंधित ठेकेदारांची सुरक्षा अनामत रक्कम जप्त केली. त्यानंतर पुन्हा नव्याने निविदा मागविल्या गेल्या. कमी दराच्या निविदांना महापालिकेने मंजूरी दिली आहे. महापालिकेच्या वतीने नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.येत्या पंधरा दिवसात नालेसफाईचे काम पूर्ण केले जाणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही.
अनेकांच्या घरात पाणी शिरते. नाले तुंबल्याने ही समस्या उद्धवते. नागरीकांना त्रासाला समोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर आज युवा सचिव म्हात्रे यांनी एमआयडीसी परिसरात नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. एमआयडीसीतील नालेसफाईची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नाल्यात कचरा आणि गाळ साठलेला दिसून आला. काही नाल्यात काही वाहिन्यामुळे गाळ काढण्यात अडथळा येत आहे. या सगळ्याची पाहणी करीत नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा केल्यास गय केली जाणार नाही असा इशारा ठेकेदाराला म्हात्रे यांनी दिला आहे.