डोंबिवलीतील ३८ बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल; बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकामांची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 09:32 AM2022-10-05T09:32:37+5:302022-10-05T09:33:44+5:30
केडीएमसीच्या नगररचना विभागाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण ग्रामीणमधील २७ बिल्डरांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असताना सोमवारी रात्री उशिरा डोंबिवलीतील ३८ बिल्डरांविरोधात रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. केडीएमसीच्या नगररचना विभागाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी मिळविल्याचा आरोप संबंधित बिल्डरांवर आहे. आतापर्यंत ६५ बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. मनपा हद्दीत सर्रास बेकायदा बांधकामे सुरू आहेत. बेकायदा बांधकामांवरून उच्च न्यायालयाने केडीएमसीला फटकारले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप पाटील यांनी बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बनावट कागदपत्रे सादर करून खोट्या सहीशिक्क्याच्या आधारे रेराचे प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप पाटील यांचा आहे. त्यांच्या आरोपानंतर केडीएमसीने या तक्रारीची चौकशी केली असता त्यांच्या आरोपात तथ्य आढळून आले. अखेर मनपाच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात २८ सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला. सोमवारी रात्री उशीरा अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारत बांधकामाची परवानगी मिळविणाऱ्या ३८ बिल्डरांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महापालिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.
काय आहेत आरोप?
संबंधित ३८ बिल्डरांनी २०१९ पासून ते आतापर्यंत बांधकाम करण्यासाठी केडीएमसीचा विकास अधिभार शुल्क न भरता बांधकाम परवानगीची बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी आहेत असे भासवून सादर केली आणि महापालिकेची फसवणूक केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"