टिटवाळ्यातील ५१ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल; २८ लाख ७९ हजार रुपयांच्या वीजचोरीचे प्रकरण
By अनिकेत घमंडी | Updated: December 29, 2022 18:03 IST2022-12-29T18:02:06+5:302022-12-29T18:03:04+5:30
कारवाईनंतर वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम न भरल्याने गुन्हा दाखल होण्यासाठी सहायक अभियंता निलेश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

टिटवाळ्यातील ५१ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल; २८ लाख ७९ हजार रुपयांच्या वीजचोरीचे प्रकरण
डोंबिवली: महावितरणच्या विशेष पथकाने वीजचोरी उघडकीस आणलेल्या टिटवाळा येथील ५१ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात वीज कायदा २००३ च्या कलम अन्वये गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. कारवाईनंतर वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम न भरल्याने गुन्हा दाखल होण्यासाठी सहायक अभियंता निलेश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
विशेष मोहिमेंतर्गत महावितरणच्या पथकाने टिटवाळ्यातील विदिशा चाळ, आंबेडकर चौक, उंबारणी रोड, मोहेली रोड, अशोक दारुवाला चाळ, दळवी चाळ, पटेल चाळ, गणेशवाडी, सावित्रीबाई फुले नगर, कुळस्वामी चाळ, साईबाबा चाळ आदी भागात वीजचोरी शोध मोहिम राबवली होती. या कारवाईत मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅपिंग करून ५१ जणांकडे वीजचोरी सुरू असल्याचे आढळले. त्यानूसार त्यांनी वापरलेल्या चोरीच्या विजेचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत नोटिस देण्यात आली होती.
मात्र संबंधितांनी या रकमेचा भरणा न केल्याने त्यांच्याविरुद्ध फिर्याद देण्यात आली. त्यानुसार मुरबाड पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे करत आहेत.