लोकल प्रवाशांची साद! 'कल्याण'चं काहीतरी कर रे रामराया...

By अमेय गोगटे | Published: June 28, 2024 07:25 AM2024-06-28T07:25:15+5:302024-06-28T07:28:13+5:30

मेल-एक्सप्रेसची संख्या आणि क्रॉसिंग हे कल्याणपल्याड राहणाऱ्या नोकरदार वर्गाच्या वाटेतील मोठा अडथळा ठरत आहे.

central railway Commuters living next to Kalyan have to suffer daily due to Mail Express trains | लोकल प्रवाशांची साद! 'कल्याण'चं काहीतरी कर रे रामराया...

लोकल प्रवाशांची साद! 'कल्याण'चं काहीतरी कर रे रामराया...

- अमेय गोगटे

वेळः रात्री नऊ - सव्वानऊ. 

ठिकाणः कल्याणरेल्वे स्टेशन.

लोकलमधल्या एका कॉलेजवयीन मुलाचा मोबाईल वाजला. फोन उचलून तो म्हणाला, "आई, आत्ता कल्याणला पोहोचलीय ट्रेन. १५ मिनिटांत अंबरनाथला पोहोचतो. दादाला पाठव स्टेशनला." हा संवाद संपतो न संपतो, तोच प्लॅटफॉर्म नंबर चारवर उभ्या असलेल्या अमरावती एक्स्प्रेसने हॉर्न दिला आणि रोजच्या प्रवाशांनी 'बिच्चारा' म्हणत त्या मुलाकडे पाहिलं. कारण, अमरावती एक्स्प्रेसचं क्रॉसिंग होईपर्यंत लोकल जागची हलणार नव्हती आणि '१५ मिनिटांत दादाला पाठव' सांगणाऱ्या कॉलेजकुमाराला १५ मिनिटं जागच्या जागीच थांबावं लागणार होतं. हे चित्र कल्याण स्टेशनवर अगदी रोज - तेही सकाळ-दुपार-संध्याकाळ पाहायला मिळतं. मेल-एक्सप्रेसची संख्या आणि क्रॉसिंग हे कल्याणपल्याड राहणाऱ्या नोकरदार वर्गाच्या वाटेतील मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे 'कल्याण करी रामराया', या गीताच्या धर्तीवर या 'कल्याणचं काहीतरी कर रे रामराया', अशी आर्त विनवणी ही मंडळी अगदी रोज करतात. मात्र, मध्य रेल्वेचं मुख्यालय तिथून बरंच लांब असल्याने बहुधा त्यांच्या कानावर हे सूर पडत नसावेत. 

मध्य रेल्वेचा व्याप प्रचंड आहे, याबद्दल वादच नाही. तो सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणाही आहे. पण, टूबीएचकेचं सामान वन रुम किचनमध्ये कसं मावणार? म्हणूनच सगळा 'पसारा' झाला आहे आणि त्यावरूनच उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. ''स्वतःची पाठ थोपटून घेणं बंद करा. लोकलमधून पडून लोक मरत आहेत. जनावरांप्रमाणे प्रवाशांची वाहतूक करताय. नुसत्या सबबी नकोत, तोडगा द्या, अशा शब्दांत न्यायालयाने रेल्वेला सुनावले आहे. यात, मध्य रेल्वेला आणखी एक तोडगा सुचवावासा वाटतो. 

मध्य रेल्वेची वेळेवर धावणारी लोकल बघायला मिळणं अतिदुर्मिळ झालं आहे. 'मरे'चं वेळापत्रक विस्कळीत व्हायला तसं तर कुठलंही कारण चालतं, पण या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या, हे या समस्येचं प्रमुख कारण म्हणता येईल. देशभरातून येणाऱ्या आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाणाऱ्या शेकडो ट्रेन रोज कर्जत-कसारामार्गे मुंबई उपनगरीय लोकल सेवेच्या ट्रॅकवर येतात किंवा इथल्या ट्रॅकवरून जातात. त्यांचं योग्य नियोजन होत नसल्यानं लोकलचं वेळापत्रक 'ट्रॅक'वरून घसरतं. हे चित्र बदलण्यासाठी गरज आहे ती नव्या ट्रॅकची. 

आज लोकल सेवेसाठी असलेल्या लाईनवरूनच मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्याही धावतात. लांबून येणाऱ्या गाड्या रखडल्या की लोकलच्या भरगच्च वेळापत्रकात त्यांना अॅडजस्ट करावं लागतं आणि इथेच घोळ होतो. एखादी लोकल थांबवून लांब पल्ल्याची मेल - एक्स्प्रेस सोडली जाते आणि मग ५ मिनिटं, १० मिनिटं करत-करत लोकल रखडत जातात. गर्दीच्या वेळी मिनिटाला शेकडो प्रवासी प्लॅटफॉर्मवर धडकत असतात. ऑफिसची वेळ चुकायला नको, म्हणून मिळेल त्या लोकलमध्ये ते शिरतात. चेंगरत, गुदमरत किंवा मग दारातच लटकत प्रवास करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा, मेल-एक्सप्रेससाठी स्वतंत्र लाइनच्या पर्यायाचा रेल्वेने गांभीर्याने विचार करायला हवा.

त्याशिवाय, कल्याणलाच नवं टर्मिनस करता येईल का, याचाही विचार करता येऊ शकेल. म्हणजे, लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या गाड्या तिथूनच सुटतील आणि येणाऱ्या ट्रेन तिथेच प्रवास संपवतील. पुणे, नाशिकहून नोकरदारांना घेऊन येणाऱ्या एक्स्प्रेस फक्त सीएसएमटीपर्यंत जातील, अशी व्यवस्था करता येईल. त्यामुळे उपनगरीय मार्गावरील ताण बराच कमी होऊ शकेल. त्याजागी कल्याणहून ठाणे, दादर आणि सीएसएमटीच्या दिशेने अतिरिक्त लोकल सोडता येतील. ज्यामुळे मेल-एक्सप्रेसमधील प्रवाशांचीही सोय होईल आणि नोकरदारांचीही.   

खरं तर, गेली अनेक वर्षं अशा पर्यायांची चर्चा होतेय, पण काम अगदीच 'स्लो ट्रॅकवर' आहे. सगळ्या लोकल १५ डब्यांच्या करा, अशी मागणी तर जोरात होतेय. वास्तविक, रेल्वेकडे घसघशीत बजेट आहे, स्वतःच्या मालकीची जागा आहे, नसल्यास अधिग्रहण करण्याची सोय आहे. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची!

"२०१० मध्ये ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना ठाणे-कर्जत, ठाणे कसारा मार्गावर ३२ फेऱ्या सुरू करण्याची घोषणा झाली होती. गेल्या १४ वर्षांत जेमतेम ४ ते ६ फेऱ्या सुरू झाल्यात. कल्याण-कसारा मार्गावर तिसऱ्या लाइनची घोषणा २०११ साली झाली. पण अजून जमीन अधिग्रहणही झालेलं नाही. मेल-एक्सप्रेसची संख्या वाढत चाललीय आणि रोज प्रत्येक लोकल ५ ते २५ मिनिटं उशिराने धावतेय. रोजच्या लेटमार्कमुळे काहींना तर नोकऱ्याही गमवाव्या लागल्यात. पण रेल्वेला त्याचं काही नाही. उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले ते बरंच झालं. आता तरी सुधारणा करावी ही अपेक्षा" - राजेश  घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना

Web Title: central railway Commuters living next to Kalyan have to suffer daily due to Mail Express trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.