मध्ये रेल्वे अखेर पूर्वपदावर; सिग्नल यंत्रणेतील बिघाडाने झाला होता खोळंबा
By अनिकेत घमंडी | Published: August 29, 2023 12:59 PM2023-08-29T12:59:18+5:302023-08-29T13:00:20+5:30
कल्याण रेल्वे स्थानकात सकाळी घडली होती घटना
अनिकेत घमंडी, डोंबिवली: कल्याण जंक्शन रेल्वे स्थानकात फलाट क्र. ६,७ वरील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजता घडली. त्यामुळे कर्जत, बदलापूर, अंबरनाथ येथून येणाऱ्या उपनगरी लोकल आणि नाशिक, पुणे मार्गे येणाऱ्या लांबपल्याच्या गाड्या शहाड, विठ्ठलवाडी मार्गावर उभ्या होत्या, त्यामुळे मध्य रेल्वे सकाळच्या पहिल्या सत्रात विस्कळीत झाली होती. या गोंधळामुळे मुख्य मार्गवरील अप डाऊन दोन्ही दिशांवरील वाहतूक डोंबिवली, कल्याण दरम्यान खोळंबली होती. त्यामुळे चाकरमान्यांचे व विद्यार्थ्यांचे हाल झाले. त्यानंतर अखेर दोन-अडीच तासाने वाहतूक पूर्वपदावर आली.
टेक्निकल बिघाड असल्याचे कारण रेल्वेने दिले होते, त्याबाबत कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना उद्घोषणा यंत्राद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. सकाळच्या वेळेतील बिघाडामुळे रेल्वेचे काही ठिकाणी बंचिंग झाले होते, साधारण पाऊण तासाने ती समस्या सोडवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले, आणि सकाळी ७ वाजून १० मिनिटांच्या सुमारास त्या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली होती. त्या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीसह ग्रामीण भागातील लोकलचे वेळापत्रक सुमारे दीड तासभर प्रभावित झाले होते तेथील लोकल वाहतूक सकाळी ८.४५ पर्यन्त १५ मिनिटे विलंबाने सुरु होती. ९ नंतर धीम्या, जलद मार्गावरील वाहतूक वेळापत्रकानुसार धावली.
सकाळी ८.५० दरम्यान कल्याण येथून मुंबई येथे जाणारी एसी लोकल ही फलाट ६ वर जाते, नेहमीप्रमाणे ती कल्याणला गेली आणि तेथून वेळेत सुटल्याची माहिती महिला प्रवाशांनी दिली. त्यामुळे ९ नंतर वाहतूक सुरळीत सुरू होती, असे सांगण्यात आले.