मध्य रेल्वेचे अधिकारी महिला प्रवाशांच्या समस्या ऐकण्यासाठी वेळ देत नाहीत
By अनिकेत घमंडी | Published: March 8, 2023 01:47 PM2023-03-08T13:47:05+5:302023-03-08T13:47:37+5:30
उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेने केला निषेध; काळ्या फिती लावून प्रवास करण्याचे केले आवाहन
डोंबिवली : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे, त्यांच्या प्रवासात समस्या वाढलेल्या आहेत, त्याची दखल कोणी घेत नाही, सहा महिन्यांपूर्वी पत्र देऊनही एखाद्या प्रवासी संघटनेला रेल्वे अधिकारी बैठकीची वेळ देत नाहीत, हे योग्य नसल्याच्या निषेधार्थ उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेने बुधवारी महिलांच्या समस्या निराकरणासाठी रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महिला प्रवाशांनी काळ्या फिती लावून प्रवास करावा असे आवाहन करून काळ्या फितीचे वाटप केले.
यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार।देशमुख यांनी सांगितले।की, ठाणे, डोंबिवलीसह बदलापूर, आसनगाव मार्गावर संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी काळ्या फितीचे वाटप करून महिला प्रवाशांना आवाहन।केले. डोंबिवली स्थानकातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला नोकरदार वर्गाची आणि तिकीट-पास काढून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढत असूनही असे असले तरी रेल्वेने महिलांसाठी अद्यापही डबे वाढवलेले नाहीत. काही रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वच्छ शौचालयांची सोय केलेली नाही. अनेकदा तर शौचालय कुलूप बंद अवस्थेत दिसून येतात. अशावेळी महिलांची गैरसोय होते. अशा अनेक समस्या महिला प्रवासी सहन करत आहेत. यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातही संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन हा सामाजिक,आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रातील महिलांना समान संधी व अधिकार देणे याची आठवण करून देण्यासाठी आहे. तसेच लैंगिक समानता आणि महिलांच्या अधिकारांवर केंद्रीत आहे. पण पुरोगामी महाराष्ट्रातील व भारताची आर्थिक राजधानी म्हणून जगभरात ओळख असलेल्या मुंबई शहरातील उपनगरीय रेल्वे प्रवासी महिलांना आजही त्यांच्या समान हक्क व अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवासी महिलांची फार मोठ्या प्रमाणात अवहेलना होऊन तिचा रोजचा प्रवास हा असुरक्षित झालेला असल्याचे देशमुख म्हणाले. सहा महिन्यांपूर्वी महिलांच्या समस्यांचे गार्हाणे मांडण्यासाठी डिआरएम अधिकाऱ्यांची संस्थेने भेट घेऊन निवेदन सादर केले होते. पण त्या निवेदनाला केराची टोपली दाखवली असे देशमुख म्हणाले. आठ दिवसांपूर्वी पुन्हा एकदा निवेदन सादर करत आठवण करुन दिली आणि आंदोलनाचीही कल्पना दिली आहे. मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने निषेध केल्याचे ते म्हणाले.