KDMC Budget 2022: केडीएमटीतून लवकरच स्वस्तात गारेगार प्रवास, एसीच्या तिकिटात ४० टक्के कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 11:20 AM2022-03-05T11:20:39+5:302022-03-05T11:21:13+5:30
KDMT Budget 2022: दीपक सावंत यांनी सादर केले बजेट : दर्जेदार वाहतूक सेवा देण्यावर भर
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घटलेले उत्पन्न आणि इंधन दरवाढीमुळे अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या सुविधा अंमलबजावणीअभावी कागदोपत्रीच राहिल्या. मात्र, शुक्रवारी केडीएमसीचे व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सादर केलेल्या अर्थसंकल्पात २०२२-२३ या वर्षात दर्जेदार वाहतूक सेवा देतानाच वातानुकूलित (एसी) बसच्या तिकीट दरात ४० टक्के कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना केडीएमटी बसमधून लवकरच स्वस्तात गारेगार प्रवास करता येणार आहे.
२०२२-२३ चे १६७ कोटी ३४ लाख रुपये जमा आणि १६४ कोटी ८४ लाख रुपये खर्च, असा अडीच कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पूर्वीच्या २५८ बसपैकी आयुर्मान संपलेल्या ५२ बस व नजीकच्या काळात आयुर्मान संपुष्टात येणाऱ्या आणि दुरुस्तीसाठी खर्चिक ६९ बस, अशा १२१ बस भंगारात काढण्यास मंजुरी मिळाली आहे. उर्वरित १३७ बस, ‘तेजस्विनी’च्या चार बस, अशा एकूण १४१ बस चालविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर २०७ इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या असून, चालू वर्षात त्यापैकी ११२ बस उपक्रमात दाखल होतील. यातील ५० बस एसी आहेत. याआधी उपक्रमाकडे १० एसी बस आहेत. दरम्यान, आता एसी बस वाढणार असल्याने त्या बसच्या भाडेदरात ४० टक्के कपातीचा उपक्रमाचा मानस प्रवाशांसाठी दिलासादायक आहे. इलेक्ट्रिक बसमुळे उपक्रमाच्या खर्चातही ६० टक्के कपात होणार आहे.
६२ चार्जिंग स्टेशन उभारणार
इलेक्ट्रिक बस ताफ्यात येणार असल्याने तसेच नागरिकांचाही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे वाढलेला कल पाहता केडीएमसी स्वत:च्या मालकीची व पीपीपी तत्त्वावर ६२ चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.
व्हीटीएमएस प्रणाली
बस व बस थांबे तसेच तिकिटिंग प्रणालीत आधुनिकता आणण्यासाठी व्हीटीएमएस प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यात मोबाइल ॲपद्वारे बसचे वेळापत्रक व बसचा मार्ग पाहता येणार आहे.
आगारातील जागा देणार भाड्याने
परिवहन उपक्रम तोट्यात आहे. त्यामुळे गणेश घाट, वसंत व्हॅली आगारातील परिवहनच्या मोकळ्या जागांवर वाणिज्य वापराच्या भव्य इमारती बांधून तेथे परिवहन उपक्रमासाठी आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सुविधा देऊन उर्वरित जागा नामांकित कंपन्यांसाठी भाडे तत्त्वावर व विक्री करून उपक्रमाच्या उत्पन्नात चांगली भर पडेल, यादृष्टीने सल्लागार नेमून नियोजन करण्यात येणार आहे.